‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ परिसंवादात तज्ज्ञांचा मूलमंत्र

दहावी आणि बारावीनंतर उच्चशिक्षण व करिअरचा मार्ग निवडताना विद्यार्थ्यांनी आपल्या अभिरुचीप्रमाणेच क्षेत्र निवडावे, असा मूलमंत्र ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या परिसंवादात तज्ज्ञ मंडळींनी विद्यार्थाना दिला. दरवर्षी परीक्षेची हुरहुर संपली की त्याचसोबत एका नव्या हुरहुरीचा प्रारंभ होतो. एका बाजूला आईबाबा आणि मित्रमैत्रिणींचा आग्रह म्हणून तर दुसऱ्या बाजूला सामाजिक प्रतिष्ठा आणि व्यवसायातून मिळणारी सधनता या गोष्टींमुळे करिअर निवडण्याच्या प्रश्नावर विद्यार्थी व पालकांची दमछाक होत होती. याच धर्तीवर ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ परिसंवाद प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिर येथे रविवारी आयोजित करण्यात आला होता. याला विद्यार्थ्यांचा व पालकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.

‘एसआरएम युनिव्हर्सिटी’ प्रस्तुत आणि ‘रोबोमेट’ यांच्या सहकार्याने आयोजित या परिसंवादाच्या पहिल्या सत्रात ‘दहावी-बारावी’च्या परीक्षांना सामोरे जाताना येणाऱ्या तणावाचा सामना कसा करावा?’ याविषयी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी पहिल्या सत्रात विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. या वेळी करिअर निवडताना विद्यार्थी आणि पालकांनी वेळ काढून विषय नीट समजावून घ्यायला हवा. दहावी आणि बारावीच्या परीक्षाकाळात विद्यार्थी आहार आणि झोप याकडे दुर्लक्ष करतात. झोपेचा मेंदूशी निकटचा संबंध असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आठ तास झोप घेणे आवश्यक आहे, असे शेट्टी म्हणाले. याशिवाय बरेच पालक आपली स्वप्नं आपल्या पाल्यांनी पूर्ण करावी यासाठी त्यांच्यावर दबाब टाकतात. ही अतिशय चुकीची बाब आहे. पालकांनी विद्यार्थाना खासगी शिक्षण देणाऱ्या वर्गात पाठवण्यापेक्षा घरातच विद्यार्थ्यांसाठी वातावरण तयार करणे आवश्यक असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. कठीण विषय अतिशय सोप्या पद्धतीने मांडून शेट्टी यांनी खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थी-पालकांना मार्गदर्शन केले.

दुसऱ्या सत्रात, आधुनिक काळाप्रमाणे बद्दल होत असले तरी वैद्यकशास्त्र हे एक स्थिर शास्त्र आहे. यात पुष्कळ संधी आहेत. हे आकडेवारीशी स्पष्ट करायचे झाल्यास, सध्या महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटींच्या घरात आहे. यात ‘विश्व स्वास्थ्य संस्था’च्या नियमानुसार सहाशे लोकांमागे एक डॉक्टर असणे आवश्यक आहे. मात्र सध्या आपल्याकडे एक लाख ९० हजार डॉक्टरांची कमतरता आहे. हीच परिस्थिती अ‍ॅलोपथी आणि पॅरामेडिकल व्यवसायातही आहे. याचाच अर्थ देशात डॉक्टरांची मोठी कमतरता आहे. याचे कारण म्हणजे देशात मेडिकल महाविद्यालयांची संख्या कमी आहे.

२००७ पासून मेडिकल महाविद्यालयांची संख्या वाढत असली तरी सध्या ही संख्या केवळ ४०२ वर आहे. त्यामुळे वैद्यकशास्त्रात विद्यार्थी पुष्कळ प्रगती करू शकतात असा विश्वास केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केला. सध्या महाराष्ट्रात ४५ वैद्यकीय महाविद्यालय आहेत. यांतील २५ खासगी तर २० सरकारी आहेत. यात सरकारी महाविद्यालयांतही आजही उत्तम शिक्षण मिळत आहे. वर्षभराची फीदेखील ४० ते ५० हजार रुपये आहे. यामुळे चांगले डॉक्टर तिथे नक्कीच तयार होऊ शकतात. त्याचप्रमाणे काही खासगी महाविद्यालयातही चांगले शिक्षण दिले जात आहे. केवळ विद्यार्थ्यांनी कष्ट आणि सेवा करण्याची तयारी ठेवावी, असे सुपे म्हणाले. याशिवाय सध्या चीन आणि रशियांमध्ये वैद्यशास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आकर्षित जाहीरातींद्वारे भुरळ घातली जाते. मात्र अशा गोष्टींना बळी पडू नये. सध्याच्या स्पेशलायझेशनच्या काळात स्पेश्ॉलिस्टचा अभ्यास करणे सामाजिक गरज होऊन बसली असल्याचे सुपे यांनी स्पष्ट केले.

तर तिसऱ्या सत्रात, सध्या विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळालेले एकूण गुण आणि मित्रमैत्रिणी सांगताहेत म्हणून करिअरची निवड केली जाते. स्वत:ला कोणत्या क्षेत्रात आवड आहे? याचा विचार केला जात नाही. हे दुर्दैवी आहे. त्यामुळे निकाल लागण्यापूर्वी पाल्याची ‘अभियोग्यता चाचणी’ करून घ्या, असा सल्ला करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी दिला. विज्ञान शाखेचा अभ्यास केल्यानंतरच मोठय़ा संधी उपलब्ध होतील. असा विचार करून अनेक विद्यार्थी त्या विषयाची अभिरुची नसतानाही त्याकडे वळत असतात. ही चुकीची बाब आहे. विज्ञान शाखेप्रमाणेच वाणिज्य आणि कला शाखेत प्रचंड संधी असल्याचे वेलणकर म्हणाले. याशिवाय सध्या भ्रमणध्वनीमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होत आहे. त्यामुळे अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनी बंद ठेवावा, असा सल्लाही वेलणकरांनी दिला. दरम्यान महेश टय़ुटोरिअलचे कमलेश गावडे आणि एसआरएम युनिव्हर्सिटीचे चैतन्य यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.