डॉ. नीरज हातेकर यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईमुळे टीकेचे धनी बनलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांची बुधवारी अक्षरश: कोंडी झाली. हातेकरांच्या निलंबनाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना टाळण्यासाठी वेळुकरांनी स्वत:ला ‘फिरोजशहा मेहता भवना’त कोंडून घेतले. हातेकरांवरील कारवाईविरोधात आता प्राध्यापकांची संघटना असलेल्या बुक्टूनेही आक्रमक पवित्रा घेतल्याने वेळूकर चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
हातेकर यांच्यावरील कारवाईचा निषेध म्हणून बुधवारी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागबरोबरच समाजशास्त्र, राज्यशास्त्र, हिंदी, जर्मन आदी विविध विद्याशाखांच्या ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळत कलिना येथील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर तब्बल चार तास धरणे आंदोलन केले. या आंदोलनात काही प्राध्यापकांनीही सहभाग घेतला, तर काही प्राध्यापकांनी बुधवारी वर्ग घेण्याचे टाळून आंदोलकांना पाठिंबा दिला. हे आंदोलन सुरू असतानाच कुलगुरू वेळूकर एका कार्यक्रमासाठी ‘फिरोजशहा मेहता भवन’ येथे आल्याचे माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तेथे धाव घेऊन घोषणाबाजी सुरू केली. ‘आम्हाला कुलगुरूंना भेटून आपली बाजू मांडायची आहे’ असे विद्यार्थी अत्यंत शांतपणे सांगत असताना कुलगुरूंनी मात्र भवनाचे दरवाजे बंद करून विद्यार्थ्यांना मज्जाव केला. बाहेर बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनीही भवनाला कुलुप लावले. त्यामुळे याठिकाणी उपस्थित असलेल्या प्राध्यापकांशी पोलिसांची बाचाबाची झाली. मात्र, तरीही वेळूकर बाहेर आले नाहीत. ‘विद्यार्थी शांतपणे निदर्शने करीत असताना त्यांच्याशी असे तुच्छतेने वागण्याची गरज काय,’ असा सवाल एका प्राध्यापकाने केला. विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची संघटना ‘युनिव्‍‌र्हसिटी कम्युनिटी फॉर डेमॉक्रसी अ‍ॅण्ड इक्वॅलिटी’नेही (यूसीडीई) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित निदर्शने केली. अधिक वृत्त ४