समीर कर्णुक

मानखुर्दमध्ये नाल्यावर पूल नसल्याने स्थानिकांची कुचंबणा; महापालिकेच्या दिरंगाईबाबत नाराजी

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात गेल्या काही वर्षांमध्ये कोटय़वधी रुपये खर्च करून अनेक स्कायवॉक आणि पादचारी पूल उभे राहिले असले तरी याच शहरातील एका परिसरात शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना नाल्यातून वाट काढावी लागत आहे. अनेक वर्षे येथील रहिवासी पादचारी पुलाची मागणी करत आहेत. मात्र त्याला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना झाल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न स्थानिक करत आहेत.

मानखुर्दच्या साठेनगर आणि पीएमजीपी कॉलनीच्या मधून हा नाला वाहतो. त्यावर पादचारी पूल नसल्याने गेली अनेक वर्षे येथील रहिवाशांना ही कसरत करावी लागत आहे. साठेनगर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना मानखुर्द रेल्वे स्थानक अथवा शीव-पनवेल मार्गाकडे येण्यासाठी पीएमजीपी कॉलनी पार करावी लागते. मात्र या ठिकाणी येण्यासाठी मोठा वळसा घालावा लागतो. त्यामुळे काही वर्षांपूर्वी रहिवाशांनीच या नाल्यावर एक लाकडी पूल तयार केला आणि त्यावरून ये-जा सुरू केली. मात्र तीन वर्षांपूर्वी पालिकेने नालेसफाई करताना हा लाकडी पूल तोडून टाकला. परिणामी रहिवाशांना या नाल्यातून वाट काढावी लागते आहे. रहिवाशांची ही कसरत पाहून पालिकेने याठिकाणी पूल बांधण्यासाठी सुरुवातही केली. मात्र गेल्या वर्षभरात १० टक्केही काम न झाल्याने रहिवाशांना जीव मुठीत धरून याच नाल्यातून ये-जा करावी लागत आहे.

दुर्दैवाची बाब म्हणजे शाळेत जाणारी अनेक लहान मुलेही याच नाल्यातून जीव धोक्यात घालून शाळा गाठत आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने अनेकदा नाल्यामध्ये पाण्याचा प्रवाह वाढतो. त्यामुळे एखादा अपघात होण्याची भीती रहिवाशांमध्ये आहे.  अनेकदा मागणी करूनही पुलाचे काम सुरू होत नसल्याने आम्हाला नाइलाजास्तव हा नाला पार करावा लागतो, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशी नूर मोहम्मद यांनी दिली.

या ठिकाणी पूल बांधण्याचे काम पालिकेच्या पूल विभागाकडून सुरू आहे. मात्र पावसामुळे सध्या काम बंद असून पावसाळा संपल्यावर कामाला पुन्हा सुरुवात होईल.

– श्रीनिवास किळजे, साहाय्यक आयुक्त, एम पूर्व विभाग, महापालिका