वर्ष संपल्यानंतरही पदवी प्रमाणपत्राची प्रतीक्षा

नमिता धुरी, मुंबई</strong>

मुंबई विद्यापीठ आणि महाविद्यालय यांच्यातील विसंवादाचे परिणाम गिरगावच्या भवन्स महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीला भोगावे लागत आहेत. या विसंवादामुळे एप्रिल, २०१८ मध्ये भवन्स महाविद्यालयातून कला शाखेच्या सहाव्या सत्राची परीक्षा दिलेल्या फातेमा हकीम या विद्यार्थिनीला वर्ष होत आले तरी पाचव्या आणि सहाव्या सत्राची गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र मिळालेले नाही.

फातेमाने मुंबई विद्यापीठाच्या ‘दूर व मुक्त अध्ययन संस्थे’तून (आयडॉल) २०१६ साली कला शाखेच्या पहिल्या वर्षांची परीक्षा दिली. त्यानंतर २०१६-१७ या वर्षांत तिने भवन्स महाविद्यालयात दुसऱ्या वर्षांसाठी प्रवेश घेतला. या वेळी महाविद्यालयाने विद्यापीठाकडे तिची ऑनलाइन नोंदणी केली नाही. तिसऱ्या वर्षांची पाचव्या सत्राची परीक्षा तोंडावर आली असता महाविद्यालयाला जाग आली. त्यांनी विविध कागदपत्रे विद्यापीठाकडून आणण्यास फातेमाला सांगितले. या संपूर्ण प्रक्रियेत फातेमाचा बराच वेळ वाया गेला. शिवाय वेळेत कागदपत्र न मिळाल्याने पाचव्या सत्राच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र तिला मिळाले नाही.

भवन्स महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीमंत राठोड यांनी फातेमाला परीक्षेला बसू द्यावे, असे पत्र फातेमाचे परीक्षा केंद्र जय हिंद महाविद्यालयाच्या प्राचार्याना लिहिले. त्यानुसार विशेष विद्यार्थ्यांच्या वर्गात बसून फातेमाने परीक्षा दिली. त्यानंतर भवन्सने विद्यापीठाला पत्र लिहून आपली चूक मान्य केली व आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण होऊन फातेमाची विद्यापीठाकडे नोंदणी झाली. सहाव्या सत्राच्या परीक्षेसाठी तिला प्रवेशपत्रही मिळाले. ती दोन्ही सत्रांच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. मात्र अद्याप तिला गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र मिळालेले नाही. यामुळे नोकरी मिळवण्यातही अडचणी येत आहेत.

आता सारवासारव

‘‘फातेमाने विद्यापीठाच्या विद्यार्थी तक्रार निवारण विभागाकडे तक्रार केली असता महाविद्यालयाने विद्यापीठाला आवश्यक ते कागदपत्र आणि तिचे परीक्षेतील गुण सादर केले. मात्र तरीही विद्यापीठाकडून तिला गुणपत्रक मिळालेले नाही. फातेमा पुन्हा येऊन मला भेटल्यास मी  स्वत: लक्ष घालून तिचे गुणपत्रक मिळवून देईन,’’ असे राठोड यांनी सांगितले, तर ‘‘या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून फातेमाला तिचे गुणपत्रक आणि पदवी प्रमाणपत्र मिळवून दिले जाईल,’’ असे विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विनोद माळाळे यांनी सांगितले.