नमिता धुरी

देशभरातील विद्यापीठांमध्ये विविध प्रश्नांवरून असंतोषाचे वातावरण असताना मुंबई विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनीही आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. योग्य ती शैक्षणिक पात्रता असलेल्या प्राध्यापकांचा अभाव, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश आणि सोयीसुविधांची वानवा यामुळे विद्यार्थी अस्वस्थ आहेत.

विभाग संचालक, निबंधक, कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्याकडे लेखी तक्रारी करूनही दखल न घेतल्यामुळे सोमवारी, १३ जानेवारीला आंदोलन करून संचालक योगेश सोमण यांच्या राजीनाम्याची मागणी नाटय़शास्त्राचे विद्यार्थी करणार आहेत.

दरवर्षी नाटय़शास्त्राच्या पदव्युत्तर पदवीसाठी २५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यानुसार वसतिगृहाची व्यवस्था असते. मात्र यंदा ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याने अनेकांना वसतिगृहात जागा मिळू शकली नाही. विद्यार्थीसंख्या वाढल्यामुळे त्याचा परिणाम शिक्षणावरही झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

विद्यार्थ्यांचे ‘नटराज’ आणि ‘रंगकर्मी’ असे दोन वर्ग करण्यात आले आहेत. नटराज वर्गात ‘अभिनय’ विषयासाठी पात्र असलेल्या प्राध्यापकांच्या तासिका दोन महिने चालल्या. मात्र ‘रंगकर्मी’ वर्गाच्या तासिका फक्त पाच दिवस चालल्या. त्या प्राध्यापकांची ‘एनएसडी’च्या वर्गासाठी वर्णी लागल्याने अभिनय या विषयासाठी अन्य एका प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली. मात्र या प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता ‘हिस्ट्री ऑफ मराठी थिएटर’ हा विषय शिकवण्याची आहे, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

‘लोककला’ विषयाच्या प्राध्यापकांना ‘प्रकाशयोजना’ हा विषयही देण्यात आला. तसेच नाटय़संगीताऐवजी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण दिले जात असल्याचीही विद्यार्थ्यांची तक्रार आहे. ‘रंगभूषा आणि वेशभूषा’ विषयासाठी ज्या प्राध्यापिकेचे नाव माहितीपुस्तिकेत दिले आहे, त्या प्रत्यक्षात ‘नाटय़शास्त्र’ विषय शिकवत आहेत. त्यांच्या अध्यापनाबाबत विद्यार्थी असमाधानी आहेत.

एक प्राध्यापक नसलेली व्यक्ती ‘मेडिटेशन’चे वर्ग घेत होती. त्या व्यक्तीने पदविका अभ्यासक्रमाच्या नाटकाचे दिग्दर्शनही केले. मात्र लेखी तक्रार दिल्यानंतर हा प्रकार बंद झाल्याचे विद्यार्थी सांगतात. विद्यार्थ्यांनी बराच पाठपुरावा केल्यानंतर ‘क्लासिकल इंडियन ड्रामा’ या विषयासाठी एका प्राध्यापकाची नेमणूक झाली. या विषयासाठी ३० तासिकांची गरज असल्याचे त्या प्राध्यापकोंनी विद्यार्थ्यांना सांगितले होते. प्रत्यक्षात नऊ तासिकाच घेण्यात आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. कथ्थक विषयाची तासिका दोन महिन्यांसाठी लावण्यात आली होती, मात्र शेवटच्या पंधरवडय़ात तासिका होऊच शकली नाही. त्यामुळे अभ्यासक्रम अर्धवट राहिला.

विद्यार्थी सांगतात..

’‘हिस्ट्री ऑफ मराठी थिएटर’ शिकवण्याची शैक्षणिक पात्रता असलेले प्राध्यापक ‘अभिनया’साठी.

’‘लोककला’ विषयाच्या प्राध्यापकांवर ‘प्रकाशयोजना’ शिकवण्याचीही जबाबदारी.

’नाटय़संगीताऐवजी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण दिले जात असल्याची तक्रार.

’‘नाटय़शास्त्र’ विषयासाठी ‘रंगभूषा आणि वेशभूषा’च्या प्राध्यापिका. 

’‘क्लासिकल इंडियन ड्रामा’च्या ३० तासिकांऐवजी नऊच तासिका. 

तालमीसाठी नाटय़गृहच नाही

‘नाटय़शास्त्राचे विद्यार्थी असूनही एक साधे नाटय़गृह आमच्याकडे नाही. नाटकाच्या विद्यार्थ्यांना तालीम करताना दुखापत होण्याची शक्यता असते. मात्र येथे प्रथमोचारांचीही सोय नाही. सर्व अभ्यासक्रम अर्धवट राहिले आहेत,’ अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली. अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी ३२ हजार रुपये शुल्क भरले आहे. त्यामानाने शिक्षण मिळत नसल्याने ते तणावाखाली आहेत.

विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रांक डे का जावे? त्यांनी लेखी तक्रार दिली आहे. त्याच व्यासपीठावर मी उत्तर देईन. विद्यार्थ्यांनी जे बदल करण्याची मागणी केली होती ते करण्यात आले आहेत. हे बदल माझ्याकडे लेखी आहेत. शैक्षणिक पात्रतेनुसारच प्राध्यापक शिकवत आहेत. – योगेश सोमण, संचालक, नाटय़शास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ

विद्यापीठाच्या दोन वसतिगृहांची दुरुस्ती सुरू होती त्यामुळे गैरसोय होत होती. येत्या ८ ते १० दिवसांत वसतिगृह उपलब्ध होईल. नाटय़गृह नसले तरीही तालीम करण्यासाठी पुरेशी जागा आहे.

– अजय देशमुख, निबंधक, मुंबई विद्यापीठ