शालेय मुलांच्या सहली रिसॉर्ट, समुद्र, धबधबे, नद्या, टेकडय़ा अशा सुरक्षिततेच्या दृष्टीने अयोग्य ठिकाणी आयोजित करू नयेत, असे शिक्षण विभागाचे स्पष्ट निर्देश असतानाही महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची सहल विरारच्या वॉटर रिसॉर्टमध्ये नेली जात आहे. प्रशासनाचा हा प्रस्ताव शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी कोणत्याही चर्चेविना मंजूर केला. या प्रस्तावावर बोलण्यासाठी सदस्यांनी हात उंचावलेले असताना अध्यक्षांनी दुर्लक्ष केले.

मागील वर्षी पालिका शाळांची सहल ‘किडझेनिया’ला नेण्यात आली होती. यंदा इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची सहल विरारमधील ‘ग्रेट एस्केप वॉटर पार्क’ला आयोजित केली आहे.

सुमारे ७२ हजार शालेय विद्यार्थी सहलीला जाणार आहेत. प्रति विद्यार्थी ५८५ रुपये खर्च येणार आहे. त्यानुसार या सहलीसाठी महापालिकेच्या वतीने ४ कोटी २३ लाख ६१ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.

शिक्षण समितीच्या बैठकीत बुधवारी हा प्रस्ताव पुकारताच शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी तातडीने मंजूर केला. त्यामुळे या प्रस्तावावर कोणत्याही सदस्याला मत वा विरोध नोंदवता आला नाही. अध्यक्षांनी हा प्रस्ताव घाईघाईत मंजूर केल्यामुळे भाजपच्या आरती पुगावकर यांनी आक्षेप नोंदवला. मुलांच्या सुरक्षेची कोणती काळजी प्रशासनाच्या वतीने घेतली जाणार आहे, असा सवाल त्यांनी केला. हा प्रस्ताव मंजूर करून महापालिका शिक्षण विभाग आणि शिक्षण समितीने शिक्षण विभागाच्या परिपत्रकाचेच उल्लंघन केले आहे. त्यामुळे संबंधितांवर काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महापालिका प्रशासन दरवेळी किडझेनियाला मुलांची सहल आयोजित करते. या वेळी मुलांना वेगळे काही तरी पाहता यावे म्हणून वॉटर रिसॉर्टला सहल आयोजित करण्यास सांगितले. तिथे केवळ एक फूट पाणी असून तिथे मुलांना मनसोक्त आनंद लुटता येईल. ही जागा सुरक्षित असून समिती सदस्यांनीही यावे.

– मंगेश सातमकर, अध्यक्ष, शिक्षण समिती