राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित कला महाविद्यालयांतील प्रवेश, ऑनलाइन वर्ग अशा कोणत्याही गोष्टींबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने महाविद्यालये, विद्यार्थी संभ्रमात आहेत.

राज्यातील शासकीय महाविद्यालयांचे कामकाज सुरू झाले आहे. मात्र, कला संचालनालयाच्या अखत्यारीत असलेल्या राज्यातील १७२ अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांच्या कामकाजाबाबत अद्याप संचालनालयाने काहीच सूचना दिलेल्या नाहीत. साधारण दहा अभ्यासक्रमांचे वेळापत्रक संचालनालयाने अद्यापही जाहीर केलेले नाही. टेक्सटाइल डिझाइन, इंटिरिअर डिझाइन, कला शिक्षक पदविका यांसह विविध अभ्यासक्रमांसाठी दहावी, बारावी झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमांना पात्र ठरतात.

या दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर होऊन अनेक दिवस झाले तरीही अद्याप पुढील प्रक्रियेबाबत काहीच स्पष्टता नाही. त्यामुळे पदविका अभ्यासक्रम चालवणारी महाविद्यालये गोंधळात आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाइन अभ्यासक्रम कसे असावेत, त्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत, अशी माहिती शिक्षकांनी दिली.

कला संचालनालय घेत असलेल्या एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षांची गुणपत्रकेही अद्याप दिलेली नाहीत. त्यामुळेही पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश रखडले असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

याबाबत संचालक डॉ. राजीव मिश्रा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

अहवाल धूळ खात?

परीक्षा कशी घेता येईल, अभ्यासक्रम कसे राबवावेत, ऑनलाइन अभ्यासक्रम कसे असावेत याबाबत अध्यापक आणि प्राचार्यानी साधारण महिन्याभरापूर्वी संचालनालयाला अहवाल दिला आहे. मात्र, अद्यापही त्याबाबत संचालनालयाने निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती शिक्षकांनी दिली.