खर्च वाढूनही विद्यार्थीसंख्येत घट; प्रजा फाऊंडेशनचा अहवाल

प्रत्येक विद्यार्थ्यांमागील खर्च दर वर्षी वाढत असला तरी पालिकेच्या शाळेत शिकण्यास विद्यार्थी राजी नाहीत. पालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू अशा सर्वच माध्यमांमधील शाळांना विद्यार्थी गळती लागली आहे. शिवाय पटसंख्या टिकविण्याकरिता सुरू केलेले पालिकेचे ‘सेमी इंग्रजी पॅटर्न’देखील फसले आहे. या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने त्यांची संख्या तब्बल २७ टक्क्यांनी वाढली आहे. परंतु वरच्या इयत्तांमध्ये विद्यार्थी टिकविण्यात शाळांना यश येत नसल्याने तिथेही गळतीचे प्रमाण जास्त आहे.

पालिका प्रत्येक विद्यार्थ्यांमागे सुमारे ४४ हजार रुपये खर्च करते. मात्र गेल्या पाच वर्षांत पालिका शाळेतील विद्यार्थी पटसंख्या सुमारे ९१ हजारांनी घसरली आहे, असे प्रजा फाऊंडेशनच्या पालिकेच्या शाळांमधील शिक्षणाच्या परिस्थितीवरील वार्षिक अहवालामधून समोर आले आहे. पालिकेच्या शाळेमध्ये २०१२-१३ या वर्षी ४,३४,५२३ विद्यार्थी होते. ही पटसंख्या वर्षांनुवर्षे घटत २०१६-१७ यावर्षी ३,४३,६२१ विद्यार्थी शाळेमध्ये शिकत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी सर्वात जास्त म्हणजे १० टक्के घट झाली आहे. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वात मोठी घट आहे. २०१२-१३ मध्ये पहिलीच्या वर्गात ४६,९१३ विद्यार्थी शिकत होते, तर २०१६-१७ दरम्यान पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही ३२,२१८ झाली आहे.  पालिकेच्या ‘मुंबई पब्लिक स्कूल’मधील गळतीचे प्रमाण इतर शाळांच्या तुलनेत नगण्य म्हणजेच केवळ २ टक्के असल्याचे अहवालातून समोर आले आहे. तेव्हा पालिकेने शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि गळती थांबविण्यासाठी यासारखी सकारात्मक पावले उचलावीत अशी शिफारस संस्थेने या अहवालात मांडली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसार शिक्षकांना वेतनवाढ मिळण्याचे पालिकेने उचललेले पाऊल योग्य असले तरी यामध्ये शिक्षकांसोबतच शाळा प्रशासनालाही जबाबदार ठरवावे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रादेशिक भाषांच्या शाळांना घरघरपालिकेच्या मराठी शाळांसोबतच आता हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तामिळ आणि तेलगू या माध्यमाच्या शाळांकडे पालकांनी पाठ फिरवल्यामुळे या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मागील पाच वर्षांत हिंदी माध्यमाच्या शाळेमधील पटसंख्या मोठय़ा प्रमाणात कमी होत आहे. गेल्या वर्षी हिंदी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १,१९,३८४ होती. यंदा यामध्ये मोठी घट झाली असून १,००,७०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पाठ

शाळा टिकविण्यासाठी पालिकेने सुरू केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढत असली तरी या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र घटत आहे. २०१२-१३ मध्ये इंग्रजी माध्यमाच्या पहिलीच्या वर्गात ९२७८ विद्यार्थी प्रवेशित झाले होते. २०१६-१७ या वर्षी यामध्ये घट झाली असून ७९४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

‘सेमी इंग्रजी’चा सुळसुळाट, पण..

* प्रादेशिक भाषेच्या शाळा टिकविण्यासाठी मध्यम मार्ग काढलेल्या सेमी इंग्रजीच्या शाळांची संख्या २७ टक्क्यांनी वाढली आहे. २०१२-१३ या वर्षी पालिकेच्या १२ शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू होते, तर २०१६-१७ या वर्षी ५७४ शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू आहे. उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये मोठय़ा प्रमाणात सेमी इंग्रजी सुरू करण्यात आले असून त्यापाठोपाठ मराठी आणि हिंदूी माध्यमाच्या शाळांनी सेमी इंग्रजी स्वीकारले आहे. सध्या मराठी माध्यमाच्या १८,३२६ शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग भरविले जातात.

* असे असले तरी, २०१६-१७  या वर्षी सेमी इंग्रजीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण हे पालिकेच्या एकूण विद्यार्थी संख्याच्या गळतीच्या प्रमाणाइतकेच म्हणजे आठ टक्के आहे. २०१२-१३ या वर्षी सेमी इंग्रजीच्या पहिल्याच वर्गामध्ये ५७७ विद्यार्थी प्रवेशित झाले होते. त्यापैकी २५ विद्यार्थ्यांची गळती झाली आहे. हे प्रमाण वरच्या वर्गामध्ये वाढत गेले असून तिसरीमध्ये सर्वाधिक म्हणजे १२ टक्के विद्यार्थ्यांची गळती होत आहे. २०१६-१७ या वर्षांमध्ये पहिलीच्या वर्गातील ३ टक्के विद्यार्थ्यांची, दुसरीच्या ९ टक्के, तिसरीच्या १२ टक्के, चौथीच्या १० टक्के आणि पाचवीच्या ४ टक्के  विद्यार्थ्यांची गळती झाली आहे.