खासगी अनुदानित, विनाअनुदानित, पालिका शाळांची पटसंख्या १.१८ लाखाने घसरली

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाच्या भीतीने मुंबईमधील खासगी अनुदानित, विनाअनुदानित, तसेच पालिका शाळांमधील एक लाख १८ हजार विद्यार्थ्यांनी

कु टुंबीयांसह स्थलांतर केले असून स्थलांतरितांमध्ये पालिकेच्या प्राथमिक व  माध्यमिक शाळांतील ६८ हजार ३७१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परिणामी, गडगडणारी पटसंख्या सावरण्यासाठी पालिकेने केलेल्या प्रयत्नांना करोनामुळे ग्रहण लागण्याची चिन्हे आहेत.

मुंबईतील खासगी अनुदानित, विनाअनुदानित आणि पालिका शाळांमधील सुमारे ५.७९ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी सुमारे एक लाख १८ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांनी करोनाच्या भीतिपोटी स्थलांतर केले आहे. काही जण महाराष्ट्रातील आपल्या गावी, तर काही जण परराज्यात निघून गेले आहेत.

पालिकेच्या प्राथमिक शाळेत २.१७ लाख, तर माध्यमिक शाळेत ३५ हजार ३६५ विद्यार्थी शिक्षण घेत होते. यापैकी प्राथमिक शाळेतील ६० हजार १८८, तर माध्यमिक शाळेतील आठ हजार १८३ असे एकूण ६८ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी स्थलांतर केले आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वी पालिका शाळांची (प्राथमिक आणि माध्यमिक) दोन लाख ५२ हजार ३७० इतकी होती. विद्यार्थ्यांच्या स्थलांतरानंतर शाळांची पटसंख्या आता एक लाख ८४ हजार ९ वर आली आहे.

काही वर्षांपूर्वी पालिका शाळांमधील पटसंख्या घसरू लागली होती. ही घसरण रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना २७ शालोपयोगी वस्तू देण्याची योजना प्रशासनाने सुरू केली होती. त्याचा चांगला परिणाम झाल्याचे निदर्शनास आले होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व्हर्च्युअल क्लासरूम, माहिती आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यात येत आहे. मात्र आता करोनाच्या भीतिपोटी मोठय़ा संख्येने विद्यार्थ्यांनी स्थलांतर केल्यामुळे नवे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.