20 September 2020

News Flash

एमपीएससी आणि आक्षेप यांचे नाते कायम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पद्धतीत केलेल्या बदलांपासून ते परीक्षांच्या वेळापत्रकापर्यंत सर्वच आघाडय़ांवर आयोगाला उमेदवारांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.

| February 8, 2014 03:13 am

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पद्धतीत केलेल्या बदलांपासून ते परीक्षांच्या वेळापत्रकापर्यंत सर्वच आघाडय़ांवर आयोगाला उमेदवारांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. २०१४ च्या राज्य सेवा पूर्वपरीक्षेबाबत अधिसूचना दिल्यानंतर सुरुवातीस त्यात जिल्हाधिकारी आणि तहसीलदारपदांचा समावेश नव्हता. काही दिवसांनी आपल्या अधिकारांचा वापर करीत आयोगाने त्या पदांचा समावेश केला. त्या वेळीही अनेक उमेदवार नाराज होते. गेल्या रविवारी झालेल्या पूर्वपरीक्षेनंतर अनेक उमेदवारांमध्ये प्रश्नपत्रिकेबाबत तीव्र नापसंती होती. प्रश्नांचा दर्जा, त्यांची मांडणी, पेपर-२ मधील इंग्रजी उताऱ्यांच्या मराठी अनुवादाचा दर्जा, प्रश्नपत्रिकेतील शुद्धलेखन या सर्वच आघाडय़ांवर आयोगाच्या प्रश्नपत्रिका साफ अपयशी ठरल्याचे मत उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशीच व्यक्त केले होते. ६ फेब्रुवारीला आयोगाने उत्तरतालिका जाहीर केल्यानंतर या आक्षेपांची धार वाढली.
कॉपीपेस्ट छापाचे प्रश्न
पेपर-२ हा उमेदवारांचा कल तपासणारा (सी-सॅट) असतो. यातही बुद्धीला चालना देऊन निष्कर्ष काढता येण्यासारखे प्रश्न विचारण्याऐवजी आयोगाने मठ्ठपणा दाखविला आहे, अशी बोचरी टीका एका उमेदवाराने केली. उदाहरणार्थ : यात काही प्रश्न उत्क्रांतिवादावर तीन वेगवेगळे सिद्धान्त मांडणाऱ्या उताऱ्यावरचे होते. हा उतारा वाचून त्याचे विश्लेषण करून उमेदवारांनी उत्तर लिहिणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात मात्र, केवळ उताऱ्यात आहे की नाही असे ‘कॉपीपेस्ट’ छापाचे प्रश्न विचारून आयोगाने आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे.

‘बिलिगिरी’चे प्रयोजन काय?
प्रश्न क्रमांक २७ वर उमेदवारांचा विशेष आक्षेप आहे. बिलिगिरी, नीलगिरी, निमगिरी आणि नल्लमा यांपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते, या प्रश्नाचे उत्तर बिलगिरी आहे. पण भूगोलाच्या कोणत्याही क्रमिक पुस्तकात ‘बिलिगिरी’चा उल्लेख नाही. उमेदवारांनी बिलिगिरीचा संकेतस्थळावर शोध घेतला असता ती तामिळनाडूतील एक स्थानिक टेकडी असल्याचे समजले. तामिळनाडूतील एका स्थानिक टेकडीविषयीचे उमेदवारांचे ज्ञान महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पडताळण्याचे प्रयोजन काय, असा उमेदवारांचा सवाल आहे.

या प्रश्नांवर आक्षेप
पेपर-१ (अ) – ९,७१, ७२, ८६, ९२
पेपर-२ (अ) – १०, २३, २५, २६, ३५, ३७, ४८, ५०, ७६, ७९, ८०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 3:13 am

Web Title: students objection on mpsc exams question
टॅग Mpsc Exams
Next Stories
1 कामोठय़ात विद्यार्थ्यांचे आंदोलन
2 पवारांच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या मिनतवाऱ्या
3 मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या नियुक्तीचा मुद्दा उच्च न्यायालयात
Just Now!
X