रहिवाशांनी उभारलेले लाकडी पूल पालिकेकडून जमीनदोस्त

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील प्रवास सुखकर करण्यासाठी एकीकडे मेट्रो, बुलेट ट्रेन, वातानुकूलित लोकल असे प्रकल्प राबवले जात असताना याच शहरातील शेकडो विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी नाल्यातून वाट काढावी लागत आहे. मानखुर्दच्या साठेनगर परिसरातील मुलांना शाळेत जाण्यासाठी एक मोठा नाला ओलांडावा लागत असून या ठिकाणी पादचारी पूल नसल्याने नाल्यातूनच त्यांना मार्गक्रमण करावे लागते. या विद्यार्थ्यांच्या गैरसोयीकडे पालिकेने लक्ष दिलेले नाहीच; उलट येथील रहिवाशांनी उभारलेला लाकडी पूलही पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमणाच्या नावाखाली जमीनदोस्त केला.

साठेनगर हा झोपडपट्टीबहुल परिसर असून याठिकाणी हजारोंची लोकवस्ती आहे. या वस्तीमधून एक मोठा नाला गेला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना नजीकची पीएमजीपी वसाहत अथवा मानखुर्द रेल्वेस्थानकाकडे ये-जा करण्यासाठी मोठा वळसा घालावा लागतो. पायपीट आणि वेळ वाचवण्यासाठी या नाल्याच्या मधोमध एखादा पादचारी पूल तयार करण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रहिवाशांकडून करण्यात येत होती. यासाठी रहिवाशांनी पालिका आणि स्थानिक नेते मंडळींना पत्रव्यवहार देखील केला होता.

पालिका आणि स्थानिक नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत असल्याने रहिवाशांनीच दोन वर्षांपूर्वी याठिकाणी लाकडाचे दोन पूल बांधले. त्यामुळे या भागातील शाळकरी मुलांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र दोन महिन्यांपूर्वी पालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाईच्या नावाखाली हे दोन्ही पूल येथून हटवले. रहिवाशांनी याला विरोध केला असता, नालेसफाईला या पुलांमुळे अडथळा निर्माण होत असल्याचे सांगत पालिकेने हे पूल पाडले. परिणामी येथील रहिवाशांना पुन्हा एकदा पीएमजीपी वसाहत अथवा मानखुर्द रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत होता. दोन मिनिटांच्या अंतरासाठी १५ मिनिट वाया जात असल्याने रहिवाशांनी वेळ आणि पायपीट वाचवण्यासाठी थेट नाल्यातूनच रस्ता काढला आहे. याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. या परिसरातील कोणत्याही शाळेत जाण्यासाठी साठेनगरच्या विद्यार्थ्यांना नाला ओलांडावा लागतो. वळसा घालण्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचायला उशीर होतो. वेळेवर पोहचता यावे यासाठी ही शाळकरी मुले जीव धोक्यात घालून नाला पार करत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून येथील रहिवाशी अशा प्रकारे जीव धोक्यात घालून हा नाला पार करत आहेत. मात्र मोठा पाऊस झाल्यानंतर हा नाला भरून वाहत असल्याने अशावेळी अपघात होण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ याठिकाणी लक्ष घालावे अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

आम्ही या ठिकाणी कायमस्वरूपी पूल बांधण्यासाठी पालिकेकडे प्रस्ताव पाठवला आहे. तो लवकरच मंजूरदेखील होणार असल्याने येथील रहिवाशांची ही समस्या लवकरच सुटणार आहे.

– विठ्ठल लोकरे,स्थानिक नगरसेवक