ऑफलाइन मदत केंद्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा

ऑनस्क्रीन मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यामध्ये अपयशी ठरलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन मदत केंद्राबाबत विश्वासार्हता नसल्याने सध्याच्या काळातील तंत्रस्नेही विद्यार्थ्यांनी या ऑनलाइन मदत केंद्राकडे पाठ फिरवली आहे. ऑनलाइन मदत केंद्र उपलब्ध करूनही विद्यापीठाच्या परीक्षाभवनातील विद्यार्थ्यांच्या गर्दीचा लोंढा तसूभरही कमी होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यापीठाने ऑफलाइन मदत केंद्राकडे पुन्हा आपला मोर्चा वळविला आहे. दरम्यान कोकण विभागातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील केंद्रावर येत्या सोमवारपासून मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

निकालाबाबतच्या शंका घेऊन विद्यापीठामध्ये रोज हजेरी लावणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती गर्दी पाहून विद्यापीठाने काही दिवसांपूर्वीच ऑनलाइन मदत केंद्र सुरू केले आहे. या मदत केंद्रात येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विद्यापीठाने १० जणांचा चमूही कार्यरत केला आहे, परंतु तरीही निकालाबाबतच्या शंकांचे निरसन करण्यासाठी दररोज सुमारे १०० ते १५० विद्यार्थी विद्यापीठाच्या पायऱ्या झिजवत आहेत. ‘परीक्षाभवनामध्ये प्रत्यक्ष हजर असूनही आमची दखल घेतली जात नाही, तिथे ऑनलाइन तरी आम्हाला कोण दाद देणार,’ असा शंकेचा सूर विद्यार्थ्यांकडून व्यक्त केला जात आहे. ‘‘ऑनलाइन मदत केंद्रांवर तक्रार केल्यानंतर १० दिवसांनी निकालाबाबत कळविण्यात येईल असा संदेश मिळत आहे. मला परदेशी विद्यापीठात शिकण्यासाठी जायचे आहे. त्यासाठी लागणाऱ्या व्हिसाला अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर आहे. तेव्हा या मदत केंद्रावर कोणी तक्रारींचा पाठपुरावा करते असे मला वाटत नाही. म्हणूनच गेले तीन दिवस मी विद्यापीठाच्या चकरा मारत आहे,’’ असे विज्ञान शाखेच्या एका विद्यार्थ्यांने सांगितले आहे.

ऑनलाइन मदत केंद्र सुरू केले असूनही परीक्षाभवनातील गर्दीचा लोंढा कमी झालेला नाही. तेव्हा विद्यापीठाला आता परीक्षाभवनाच्या उपाहारगृहाच्या जागेमध्ये विद्यार्थ्यांसाठी मदत केंद्र सुरू करण्याची वेळ आली आहे. ऑनलाइन मदत केंद्राच्या संकेतस्थळावर आत्तापर्यंत सुमारे ९०० विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आहे; परंतु यापैकी केवळ ४० टक्के विद्यार्थ्यांनीच निकालाबाबतच्या तक्रारी नोंदविल्या आहेत, तर इतर विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाची माहिती, परीक्षेचे वेळापत्रक आदींबाबत प्रश्न विचारले असल्याची माहिती परीक्षाभवनातील सूत्रांकडून मिळाली आहे.

‘‘रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्य़ांतील विद्यार्थ्यांनी विद्यापीठामध्ये न येता निकालाबाबतच्या शंकांचे निरसन करण्यासाठी रत्नागिरी येथील मदत केंद्रावर संपर्क साधावा. विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा अहवाल रोजच्या रोज विद्यापीठामध्ये कळविण्यात येईल, जेणेकरून लवकरात लवकर त्यांच्या तक्रारींचे निरसन करणे शक्य होईल, अशा सूचना रत्नागिरी येथील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत,’’ असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक अर्जुन घाटुळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले आहे.

गर्दी करू नका.. वाट पाहा..

गैरहजर आणि शून्य गुण अशा त्रुटी घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांची विद्यापीठामधील गर्दी वाढत आहे. निकालामध्ये गैरहजर किंवा शून्य गुण दाखविलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. तेव्हा या विद्यार्थ्यांनी विद्यापीठामध्ये गर्दी न करता निकाल जाहीर होण्याची वाट पाहावी. राखीव ठेवलेले निकाल दोन आठवडय़ांमध्ये जाहीर करण्यात येतील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक अर्जुन घाटुळे यांनी स्पष्ट केले आहे.

विद्यापीठाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे निकाल जाहीर झाले असले तरी या शाखांच्या काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने या शाखांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेशाचे अर्ज स्वीकारण्याची मुदत १५ सप्टेंबर वाढवली आहे.