22 November 2017

News Flash

विद्यार्थी सुरक्षेसाठी आठवडाभरात नवी नियमावली

गुडगाव येथील रायन आंतरराष्ट्रीय विद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांची शाळेतच हत्या करण्यात आली.

खास प्रतिनिधी, मुंबई | Updated: September 14, 2017 4:10 AM

गुडगावमधील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुंबई पोलिसांचे प्रयत्न

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन नवी नियमावली मुंबई पोलिसांकडून तयार करण्यात येत आहे. येत्या आठवडय़ाभरात ही नियमावली जारी केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिली.

गुडगाव येथील रायन आंतरराष्ट्रीय विद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांची शाळेतच हत्या करण्यात आली. प्रत्यक्षात ही घटना घडण्याआधीपासूनच मुंबईतल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा, त्यासाठीचे नियम याबाबत चर्चा सुरू होती, असे पडसलगीकर यांनी सांगितले.

दहशतवादी कारवाया, अपहरणासह शारीरिक अत्याचाराचे गुन्हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुंबई पोलिसांकडून वेळोवेळी शहरातील सर्व शाळांना सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गुडगावमधील घटनेच्या पाश्र्वभूमीवर नवी नियमावली तयार करण्याची प्रक्रिया मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे.

‘पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या सूचना किंवा नियमावलीची अंमलबजावणी महत्त्वाची आहे हे शहरातील सर्व शाळा व्यवस्थापनांना पटवून देण्यात येईल. शाळा व पोलीस यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांवर सोपवली जाईल,’ असे पडसलगीकर यांनी सांगितले. दरम्यान विद्यार्थ्यांवरील शारीरिक अत्याचार रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेला पोलीस दीदी हा उपक्रम यशस्वी ठरल्याचे ते म्हणाले. या उपक्रमांतर्गत स्थानिक पोलीस प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना चांगला-वाईट स्पर्श, अनोळखी व्यक्तीने आमिष दाखवल्यास, पाठलाग केल्यास काय करावे याबाबत प्रशिक्षित केले जाते. या प्रशिक्षणामुळे शारीरिक अत्याचाराचे अनेक गुन्हे रोखण्यात यश आल्याचे पडसलगीकर यांनी सांगितले.

दहशतवाद्यांकडून शाळा लक्ष्य होत आहेत हे लक्षात येताच मुंबई पोलिसांनी शाळेभोवती संरक्षक भिंत किती उंचीची असावी, मधल्या सुट्टीत प्रवेशद्वारावर येणाऱ्या जेवणाच्या डब्यांची तपासणी, आपत्कालीन दरवाजा याबाबत पोलिसांनी नियमावली तयार केली होती.

First Published on September 14, 2017 4:10 am

Web Title: students security mumbai police