उच्चवर्गीयांचं अनुकरण करत आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालणा-या अनेक कष्टकरी पालकांनी आपल्या मुलांसाठी पुन्हा एकदा मराठी माध्यमाच्या शाळेचा रस्ता धरला आहे. इंग्रजी शाळांचा खर्च परवडत नसतानाही अनेकदा पालक आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत घालतात. मात्र आता दुसरी, चौथी अगदी पाचवीपर्यंत इंग्रजी शाळेत शिकूनही पाल्यांना इंग्रजी अभ्यासक्रम समजत नसल्याने पालक हवालदील झाले आहेत. धारावी, सायन, चुनाभट्टी परिसरातील अशा तब्बल ४० पालकांनी यंदा आपल्या पाल्याचे नाव इंग्रजी शाळेतून काढून सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूल या मराठी शाळेत घातले आहे.

धारावीत इमारतींमध्ये घरकाम करून उदरनिर्वाह करणाऱ्या सुशीला सावंत यांनी मुलगी दीपिकाला एका नावाजलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले होते. मात्र तिसरीत गेल्यानंतरही दीपिकाला शाळेचा अभ्यास न जमल्यामुळे तिचं प्रगतीपुस्तक लाल शेऱ्यांनी भरून येत होतं. घरात मराठी आणि शाळेत इंग्रजी, या कोंडीत सापडलेल्या दिपिकाचा इंग्रजीतून गृहपाठ घेणं सुशीला यांनाही शक्य होत नव्हतं. तर खासगी शिकवणी लावण्यासाठी आणखी पैसे मोजणंही त्यांना परवडणारं नव्हतं. स्वभावाने चुणचुणीत असूनही ती शाळेत गप्पगप्प राहू लागली. शिक्षिका तिच्याविषयी तक्रार करू लागल्या. अखेर सावंत यांनी दीपिकाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढलं आणि मराठी माध्यमाच्या शाळेत तिचं नाव नोंदवलं. डी. एस. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शीला देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौथीतली इशिका सणस, दुसरीतली अक्षता पोळेकर आणि पाचवीतला अक्षय माने यांच्या बाबतसुद्धा हेच घडलं.

याविषयी डी. एस. हायस्कूलचे विश्वस्त राजेंद्र प्रधान म्हणाले, दरवर्षी इंग्रजी माध्यमाच्या आकर्षणामुळे मुलांची शैक्षणिक सुरुवात इंग्रजी माध्यमातून होते. मात्र नंतर अनेक जण हे सोडूम मराठी शाळेत प्रवेश घेतात. यातही इंग्रजी माध्यमाची शाळा सोडून मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेणारी ही मुलं फक्त प्राथमिक वर्गांतील म्हणजे इयत्ता पहिली ते चौथीमधलीच नाहीत, तर माध्यमिक वर्गांतील म्हणजे इयत्ता पाचवी ते सातवी-आठवीतलीही असतात, ही आणखी एक धक्कादायक बाब. मराठी शाळेत प्रवेश घेतल्यानंतर या मुलांकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे प्रधान म्हणाले. सुखवस्तू मध्यमवर्गीय नोकरदार घरातील प्रत्येक मूलाला आज ट्यूशन लावली जाते. पण ज्यांचं मासिक उत्पन्नच ६-८-१० हजार असतं आणि घरात खाणारी पाच-सहा तोंडं असतात, अशा पालकांना मुलांच्या ट्यूशनसाठी महिन्याला ५०० ते हजार रुपये मोजणं हे केवळ अशक्य असतं. त्यामुळे शाळेत इंग्रजीतून शिकवलेल्या ज्या गोष्टी त्यांना समजत नाहीत, त्या तशाच ‘न समजलेल्या’ राहतात. दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने आणि वर्षांमागून वर्षं जात राहतात. कमकुवत अभ्यासाच्या पायावर इयत्तेचा आकडा वाढत जातो आणि मग अचानक… सारं काही कोसळतं.