12 November 2019

News Flash

वय, अपंगत्वावर मात करत दहावी उत्तीर्ण

बोरिवलीच्या शाळांतील विद्यार्थिनींची यशोगाथा

(संग्रहित छायाचित्र)

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या अनेक प्रेरणादायी कथा समोर येत आहेत. त्यापैकीच एक आहेत बोरिवली पश्चिम येथील मंगुभाई दत्ताणी शाळेची विद्यार्थिनी प्रणाली सोनावणे आणि अहिल्या रात्रशाळेच्या विद्यार्थिनी कमल शिंदे. कमल शिंदे यांनी वयाच्या ५९ व्या वर्षी दहावीची परीक्षा दिली, तर प्रणालीने शारीरिक अपंगत्वावर मात करत परीक्षा दिली.

प्रणाली साधारण एक-दीड वर्षांची असताना तिला शारीरिक अपंगत्व आले. बऱ्याच वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर प्रणालीला ‘स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफी’ हा आजार असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे तिचे स्नायू कायम कमकुवत राहिले. चौथी इयत्तेत असेपर्यंत प्रणालीला बसता येत असल्याने ती शाळेत जायची. मात्र त्यानंतर आजाराने गंभीर स्वरूप धारण केले व प्रणालीचे शाळेत जाणे बंद झाले. तिच्या आईने घरीच अभ्यास करून घेतला. काही शंका असल्यास आई स्कूटीवर बसवून तिला शाळेत घेऊन जायची. शिक्षकोंनीही चांगले सहकार्य केले.

शिक्षक प्रदीप तांबे आणि माजी विद्यार्थी संदीप माने यांनी प्रणालीच्या शिक्षणासाठी विशेष कष्ट घेतले. तिच्या शैक्षणिक आणि वैद्यकीय खर्चासाठी हातभार लावला. नियमितपणे शाळेत जाणाऱ्या आणि खासगी शिकवण्या लावलेल्या विद्यार्थ्यांनाही यंदाची परीक्षा कठीण गेली. मात्र एकही दिवस शाळेत न जाता प्रणालीने ८५.४० गुण मिळवले आहेत. पुढे वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन अकाऊंट्समध्ये करिअर करण्याची तिची इच्छा आहे.

कमल शिंदे यांनी आपले सातवीपर्यंतचे शिक्षण बऱ्याच वर्षांपूर्वी पूर्ण केले आहे. मात्र मागे तीन भावंडांचे शिक्षण बाकी होते आणि गिरणी कामगार असलेल्या वडिलांची नोकरी गेली. त्यामुळे कमल यांना शिक्षण सोडावे लागले. मात्र शिक्षणाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी रात्रशाळेत आठवीला प्रवेश घेतला. त्यांना पाहून शेजारपाजारच्या आणखी काही बायका शाळेत जाऊ लागल्या. के टरिंगचा व्यवसाय करणाऱ्यांना भाक ऱ्या, चपात्या, पुरणपोळ्या करून देण्याचे काम सांभाळून कमल यांनी अभ्यास केला. यंदा वयाच्या ५९ व्या वर्षी त्या ५० टक्क्यांसह दहावी उत्तीर्ण झाल्या आहेत. ‘काकू पास झाल्या’ म्हणत शेजारची मुले त्यांचे कौतुक करत आहेत. निकाल कळताच कमल यांच्या मुलाच्या मित्रांनी पेढे आणले. शिक्षणाला वय नसते हेच कमल यांनी आपल्या निकालावरून दाखवून दिले आहे.

First Published on June 13, 2019 1:27 am

Web Title: students success story in borivali school