27 September 2020

News Flash

खासगी विद्यापीठांची चलती ; अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळाने विद्यार्थी बेजार

तांत्रिक अडचणींमुळे आतापर्यंत झालेली प्रक्रिया रद्दच करण्याचा निर्णय प्रवेश नियमन प्राधिकरणाने घेतला.

प्रतिनिधिक छायाचित्र

रसिका मुळ्ये, मुंबई

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या राज्यातील सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांमधील केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक गोंधळ खासगी विद्यापीठांच्या पथ्यावर पडले आहेत. चार दिवस कागद पडताळणीसाठी रांगेत उभे राहिलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी अखेर वैतागून खासगी विद्यापीठांचा रस्ता पकडला आहे.

राज्यातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली होती. सोमवार ते शुक्रवार (१७ ते २१ जून) या कालावधीत केंद्रीय प्रवेश अर्ज भरणे आणि अर्जाची पडताळणी करणे अपेक्षित होते. मात्र यंदा पहिल्या दिवसापासूनच संकेतस्थळ सुरू झाले नाही. विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ‘सेतू’ केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रांवर विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पडताळणी करायची होती. मात्र कागदपत्रांची पडताळणीही सव्‍‌र्हर डाऊन झाल्यामुळे होऊ शकली नाही. या सर्व प्रक्रियेत सातत्याने येणाऱ्या अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांनी खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश निश्चित करण्यास सुरुवात केली आहे.

तांत्रिक अडचणींमुळे आतापर्यंत झालेली प्रक्रिया रद्दच करण्याचा निर्णय प्रवेश नियमन प्राधिकरणाने घेतला. सर्व प्रवेश प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाने गुरुवारी जाहीर केले. ही प्रवेश प्रक्रिया २४ जूनच्या आसपास सुरू होणार आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या अनेक नामवंत महाविद्यालयांनी खासगी विद्यापीठाचा दर्जा मिळवला आहे. अभिमत विद्यापीठांमध्येही तंत्रशिक्षण अभ्यासक्रम आहेत. यातील काही विद्यापीठांची अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता ही अगदी दीड ते दोन हजारांपर्यंत आहे. मात्र प्रवेश प्राधिकरणाची प्रवेश प्रक्रिया आता नव्याने सुरू होऊन ती पुढे सरकेपर्यंत बहुतेक खासगी विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत आहेत. तेथील संधी हुकेल आणि केंद्रीय यादीतही हवे असलेले महाविद्यालय मिळणार नाही, या भीतीने विद्यार्थी खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत आहेत.

सेतू केंद्राकडून माहितीची विक्री?विद्यार्थ्यांना खासगी विद्यापीठे त्यांच्या मोबाइलवर प्रवेशासाठी संदेश पाठवत आहेत. काही विद्यार्थ्यांना विद्यापीठाची माहिती देण्याबाबत दूरध्वनीही येत आहेत. प्राधिकरणाने तंत्रशिक्षण महाविद्यालयांना ‘सेतू’ केंद्र दिले आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संकेतस्थळावर नोंदणी केली की त्यांची सर्व माहिती सेतू केंद्रांना मिळू शकते. या माहितीच्या आधारे पुढील प्रवेश प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांची ही माहिती काही विनाअनुदानित महाविद्यालये, खासगी विद्यापीठे यांना ‘विकली’ जात असल्याचा संशय असून पुण्यातील एका सेतू केंद्रावरील कर्मचाऱ्याने त्याला दुजोरा दिला.

‘सार’चा अट्टहास नडला?

गेली काही वर्षे प्रवेश प्रक्रिया पार पाडणाऱ्या संस्थेत यंदा प्राधिकरणाने बदल केला. प्रत्येक विद्याशाखेनुसार अर्ज भरण्यासाठी पूर्वी स्वतंत्र संकेतस्थळ होते. मात्र यंदा अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुकला, हॉटेल मॅनेंजमेंट या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘सेतू असिस्टंट अ‍ॅडमिशन रजिस्टर’ (सार) या नव्या प्रणालीतर्फे एकच संकेतस्थळ तयार करण्यात आले. मात्र या एकाच संकेतस्थळावर सर्व विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केल्यामुळे प्रणालीवर ताण आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2019 3:59 am

Web Title: students suffer with mess in engineering admissions zws 70
Next Stories
1 वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू
2 घाटकोपरमधील तरुणाची हत्या :  पोलीस उपनिरीक्षकासह पाच जणांना अटक
3 Mega Blocks : रेल्वेच्या तीनही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
Just Now!
X