आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने न्हाणीघरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री विक्रोळीत उघडकीस आली. शाहिद खान (१४) असे या विद्यार्थ्यांचे नाव असून त्याने अभ्यासाच्या तणावातून हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. विक्रोळीच्या सूर्यानगर परिसरात शाहिद राहतो. जवळच्याच संदेश विद्यालयात तो आठवीच्या वर्गात शिकत आहे. परीक्षा सुरू असलेला शाहिद मंगळवारी सायंकाळी शिकवणीला गेला होता. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शिकवणीहून घरी आल्यावर आंघोळीला जात असल्याचे सांगत तो न्हाणीघरात गेला. मात्र, बराच वेळ शाहिद न आल्याने त्याच्या आत्याने न्हाणीघराचे दार ठोठावले; परंतु काहीच प्रतिसाद न मिळाल्याने आत्याने शाहिदच्या वडिलांना सांगितले. त्यांनी दार उघडल्यावर गळफास घेतलेल्या अवस्थेत शाहिद दिसून आला.