पर्यटनक्षेत्राचे क्षितीज विस्तारत असतानाच,  ‘मास्टरशेफ’सारख्या कार्यक्रमांमुळे हॉटेल व्यवस्थापन क्षेत्राला वलय प्राप्त झाले आहे. या क्षेत्रात देशातच नव्हे, परदेशातही नोकरी आणि जागतिक पातळीवरील कीर्ती मिळण्याच्या संधी उपलब्ध झाल्याने हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रमाला विद्यार्थी पसंती दर्शवत आहेत. म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र अशा विषयांकडे विद्यार्थी फिरकत नसताना हॉटेल व्यवस्थापन आणि कॅटिरग तंत्रज्ञानाच्या पदविका अभ्यासक्रमांना गेल्या काही वर्षांत चांगलीच मागणी आहे. यामुळेच यंदा महाराष्ट्रात या अभ्यासक्रमाच्या पदवी व पदविकाच्या मिळून केवळ ३९ जागाच रिक्त राहिल्या आहेत.

काही वर्षांपूर्वी हॉटेल व्यवस्थापन हे हॉटेल व्यवसायापुरते मर्यादित होते. नोकरीच्या संधीही कमी प्रमाणात उपलब्ध होत्या. त्यातही कामाचे तासही जास्त होते. त्या तुलनेत मिळणारे वेतन कमी होते. त्यामुळे सहसा कुणी याकडे क्षेत्राकडे फिरकत नसे. २०१३-१४ साली पदविका आणि पदवीच्या अभ्यासक्रमांमध्ये अनुक्रमे ७९ आणि ३० टक्के जागा रिक्त होत्या; परंतु गेल्या काही वर्षांमध्ये दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील विविध खाद्यपदार्थाच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ‘शेफ’ ही संकल्पना घराघरात पोहोचली. भारतीय पद्धतीच्या खाद्यपदार्थासोबतच परदेशी खाद्यपदार्थाचे कार्यक्रम सादर करणाऱ्या शेफमुळे हॉटेल व्यवस्थापन क्षेत्राला विशिष्ट दर्जा प्राप्त झाला आहे. पर्यटनाशी जोडून येणाऱ्या या क्षेत्रामध्ये शेफसोबतच हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रामध्ये विविध संधींची कवाडेही खुली झाली आहेत. इतकेच नव्हे तर बहुराष्ट्रीय कंपन्या, मॉल्स, रिटेल आदी क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधीही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्यामुळे २०१६-१७ साली या अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांमध्ये घट होऊन पदवी आणि पदविकासाठी अनुक्रमे ८.१० टक्के आणि १३.४९ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. या वर्षी तर पदविकाच्या रिक्त जागांमध्ये मोठय़ा प्रमाणात घट झाली असून केवळ २.६५ टक्के जागा शिल्लक राहिल्या आहेत. तर पदवीसाठी ६.८८ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत.

‘आमच्याकडे यंदा प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षीपेक्षा जास्त आहे. हॉटेल व्यवस्थापनाच्या क्षेत्राला मोठय़ा हॉटेल्सव्यतिरिक्त आयटी कंपन्या, बांधकाम, रिटेल आदी क्षेत्रांमध्येही नोकरीच्या संधी खुल्या झाल्या आहेत. आमच्याकडे प्रवेश घेणारे बहुतांश विद्यार्थी हे ‘मास्टरशेफ’ बनण्याचे स्वप्न घेऊनच आलेले दिसून येतात. पर्यटन क्षेत्राच्या विस्तारामुळे हॉटेल व्यवस्थापन क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलत चालला आहे. त्यामुळेच विद्यार्थी याकडे मोठय़ा प्रमाणात वळत आहेत,’ असे पुण्यातील ‘महाराष्ट्र स्टेट इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटिरग टेक्नॉलॉजी’च्या संचालक अनिता मुदलीयार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. पदविका अभ्यासक्रम तीन तर पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा आहे; परंतु या क्षेत्रामध्ये  संधी समानच आहेत.

पदविका अभ्यासक्रमाला पसंती

२०१३-१४ मध्ये हॉटेल व्यवस्थापनाचा पदविका आणि पदवी अभ्यासक्रम अनुक्रमे १२ आणि ९ संस्थामध्ये राज्यभरात सुरू होता; परंतु पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी होती. त्यामुळे उपलब्ध जागांच्या तुलनेत रिक्त जागांची संख्या मोठय़ा प्रमाणात असे. पुढील काही वर्षांमध्ये तर मागणी नसल्याने पदविका संस्थाच्या संख्येत घट होऊन ४ वर आली होती; परंतु आता या क्षेत्रातील पदवीपेक्षा पदविका अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे.