फक्त सहा दिवसांनी परीक्षा पुढे ढकल्याने विद्यार्थी संतप्त

मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळामुळे लांबलेली प्रवेश प्रक्रिया, उशिराने सुरु झालेले वर्ग आणि अर्धवट राहिलेला अभ्यासक्रम या कारणास्तव विधिच्या पदव्युत्तर शाखेच्या प्रथम वर्षांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत फक्त सहा दिवसांनी परीक्षा पुढे ढकलत विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी संघटनांनी विधिच्या या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याच्या धमकीवजा इशारा विद्यापीठाला शुक्रवारी दिला आहे.

विद्यापीठाच्या संगणकाधारित मूल्यांकन पद्धतीचा बोजवारा उडाल्यामुळे विधिच्या निकाल विलंबासोबतच पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियाही लांबल्या गेल्या आहेत. या शाखेचे वर्ग भरुन जेमतेम ६० दिवस झाले असताना मात्र विद्यापीठाने १७ जानेवारीपासून परीक्षा जाहीर केल्यामुळे अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली होती. परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मात्र विद्यापीठाने १७ जानेवारीची परीक्षा २३ जानेवारीपासून घेण्याचे गुरुवारी जाहीर केले.

विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याचे ढोंग करणाऱ्या विद्यापीठाने फक्त सहा दिवस परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ केला आहे. सहा दिवसांमध्ये अर्धवट राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही, याची विद्यापीठाला पुरेपुर कल्पना असूनही विद्यापीठाने मुद्दाम असा निर्णय घेतला आहे. तेव्हा या निर्णयाचा निषेध करत परीक्षांवर बहिष्कार टाकत असल्याचे विद्यापीठाला लेखी पत्राद्वारे कळविले आहे, असे स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी व्यक्त केले आहे.

प्रवेश घ्या आणि दहा दिवसांत परीक्षा द्या

मुंबई विद्यापीठाच्या विधिच्या पदव्युत्तर शाखेच्या प्रथम वर्षांच्या प्रवेशाची सहावी गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली असून यामध्ये सुमारे २० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. १२ जानेवारी रोजी या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होणार आहेत. मात्र पुढील दहा दिवसांतच म्हणजेच २३ जानेवारीपासून परीक्षा सुरु होणार आहेत. त्यामुळे प्रवेश घ्या आणि दहा दिवसांत परीक्षा द्या, असे विद्यापीठाने सांगितल्याने निकाल विलंबामुळे पोळलेल्या या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने आता परीक्षेतही मोठा फटका सोसावा लागणार आहे.