झापडबंद ‘कारकुनी बाण्या’मुळे प्रवेशाच्या तोंडावरच ‘राष्ट्रीयत्वा’च्या शोधात वणवण करण्याची वेळ एका १६ वर्षांच्या विद्यार्थ्यांवर आली आहे. कर्जतमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण झालेल्या या विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर राष्ट्रीयत्वाचा उल्लेखच नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे.
कर्जतमधील ‘अभिनव ज्ञान मंदिर-प्रशाले’तून दहावी उत्तीर्ण झालेल्या अमित कांबळे याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यातील ‘राष्ट्रीयत्व’, ‘आईचे नाव’, ‘मातृभाषा’ हे रकाने रिकामेच आहेत. राष्ट्रीयत्वाच्या रकान्यात ‘भारतीय’ असल्याचा उल्लेख नाही, म्हणून अभियांत्रिकी पदविका प्रवेशाच्या ‘केंद्रीय प्रवेश प्रक्रिये’त त्याचा अर्ज नाकारला गेला.
अमितची परिस्थिती गरिबीची आहे. त्यामुळे, गेल्या वर्षी दहावी झाल्यानंतर त्याला नोकरी पत्करावी लागली. या वर्षी अभियांत्रिकीला प्रवेश घेण्याचे त्याने ठरविले. पण दाखल्याच्या गोंधळामुळे आपले हेही वर्ष फुकट जाईल या भीतीने त्याने तडक शाळेत धाव घेऊन नवीन दाखला देण्याची विनंती केली. मात्र, ‘प्राथमिक शाळेने दिलेल्या दाखल्याच्या आधारे आम्ही हे रकाने भरले आहेत. त्यामुळे, दाखल्यात दुरुस्ती करून हवी असेल तर आधीच्या शाळेकडून तसे लिहून आण,’ असे शाळेने सांगितले.
अमितचे तिसरीपर्यंतचे शिक्षण लाडीवलीच्या जिल्हा परिषदेच्या आणि चौथीपर्यंतचे कर्जतच्या महिला मंडळाच्या शाळेत झाले होते. मात्र, या शाळेने ‘आम्हाला असे लिहून देता येणार नाही,’ असे उत्तर दिले. अमितने मग ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’चे मुंबई विद्यापीठ उपाध्यक्ष हृषीकेश जोशी यांच्याशी संपर्क साधला. जोशी यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना ‘समज’ दिल्यानंतर शाळेने अमित भारतीय असल्याचे ‘बोनाफाइड’ प्रमाणपत्र दिले. मात्र या प्रमाणपत्राचा प्रवेशासाठी काहीच उपयोग नाही. अमित भारतीय नाही तर त्याला इतके वर्षे शाळेत शिकूच कसे दिले, असा सवाल जोशी यांनी केला आहे.