मुंबई: क्षयरोगापासून लहान मुलांचे रक्षण करण्यासाठी दिली जाणारी बीसीजीची लस करोनाच्या संसर्गात ज्येष्ठांना उपयुक्त ठरते का, याबाबतचे संशोधन ‘आयसीएमआर’ने सुरू आहे. या लसीच्या उपयुक्ततेचा अभ्यास हाती घेण्यात आला असून मुंबईत वरळी, प्रभादेवी, परळ, लालबागमधील इच्छुक व्यक्तींवर हे संशोधन होणार आहे.

जगभरात करोनाचा सर्वाधिक संसर्ग ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. साठ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींमध्ये या आजाराची गंभीर लक्षणे आढळतात. तसेच त्यांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. बीसीजीची लस दिल्यास करोनाची शक्यता, गांभीर्य आणि मृत्यूदर कमी करता येईल का, तसेच त्याद्वारे भारतातील ज्येष्ठांचे संरक्षण करता येईल का याचा अभ्यास केला जाणार आहे. त्यात चेन्नई, मुंबई, अहमदाबाद, भोपाळ, जोधपूर, नवी दिल्ली या शहरांमध्ये अभ्यास केला जाणार आहे. मुंबईत केईएम रुग्णालय आणि पालिकेचा आरोग्य विभाग मिळून हा अभ्यास करणार आहे.

या अभ्यासात ६० ते ७५ वयोगटातील करोना न झालेल्या, एचआयव्ही किंवा कॅन्सर असा आजार नसलेल्या व्यक्तीची संमती असल्यास त्यांना बीसीजीची लस दिली जाणार आहे. पुढील सहा महिने त्याचा अभ्यास केला जाणार आहे.

मुंबईत वरळी, प्रभादेवीचा भाग असलेल्या जी दक्षिण विभागात व परळ, लालबागचा भाग असलेल्या एफ दक्षिण विभागात हा अभ्यास केला जाणार आहे. २५० ज्येष्ठांवर हा अभ्यास केला जाणार आहे. ज्येष्ठांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन पालिकेने केले आहे.

ज्येष्ठांसाठी संशोधन: क्षयरोगापासून लहान मुलांचे रक्षण करण्यासाठी दिली जाणारी बीसीजी लस ही अनेक श्वसन विकारांपासूनही रक्षण करते, असे आढळले आहे. विषाणूं विरोधातही ती प्रभावी असल्याचे आढळले आहे.  ही लस सहज देण्याजोगी आणि सुरक्षित आहे. त्यामुळे करोना संसर्गात ती ज्येष्ठांना उपयुक्त ठरते का याचे संशोधन सुरू झाले आहे.