हप्तेखोरी करणाऱया आणि दिवसाढवळ्या बिनदिक्कतपणे लाच उकळणाऱया तब्बल ३६ पोलिसांना बुधवारी सेवेतून निलंबित करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवसात पोलिसांना निलंबित करण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे. सर्व पोलिस मुंबईतील नेहरूनगर पोलिस ठाण्यातील आहेत.
नेहरूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका कॉलनीमधील रहिवाशांकडून लाच उकळणाऱया पोलिसांचे एका व्यक्तीने स्टिंग ऑपरेशन केले. स्टिंग ऑपरेशनची सीडी बुधवारी वृत्तवाहिनीवर दाखविण्यात आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पैसे घेणाऱया सर्व पोलिसांना निलंबित करावे, असा आदेश पोलिस आयुक्त सत्यपालसिंग यांना दिला.
निलंबित करणाऱयात आलेल्यांमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय बागाईतकर यांचा समावेश आहे. स्टिंग ऑपरेशनमध्ये पोलिस ठाण्यातील अनेक पोलिस लाच घेताना स्पष्टपणे दिसत आहेत. पोलिस लाच मागत असल्याचे कुर्ल्यातील कामगारनगरमध्ये राहणाऱया कासम खान यांनी उघड केले. खान यांचे मित्र प्रकाश नवल यांना त्यांच्या बेकायदा घराची दुरुस्ती करायची होती. मात्र, त्यासाठी पोलिसांकडून सातत्याने लाच मागण्यात येत होती. सर्व पोलिस हे बागाईतकर यांच्या नावाने पैसे मागत होते. लाच म्हणून सुमारे ४५ हजार रुपये पोलिसांना वाटण्यात आले. नेहरूनगर पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलपासून निरीक्षकापर्यंत सर्वचजण येथील रहिवाशांकडून लाच घेत होते, असे खान यांचे म्हणणे आहे. कॉन्स्टेबल ५०० ते १००० रुपयांची तर अधिकारी वर्ग २००० रुपयांची लाच मागत होते. नेहरूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदा इमारतींमध्ये राहणाऱयांकडून दरमहिन्याला लाच उकळण्यात येते, असा आरोप खान यांनी केलाय.