मराठी रंगभूमीवरील ‘हर्बेरियम’ या अभिनव उपक्रमास लाभलेल्या उत्तम यशानंतर अभिनेते-निर्माते सुनील बर्वे विविध कलागुणांचे दर्शन घडविणाऱ्या तरूणताज्या एकांकिका घेऊन नाटय़रसिकांसमोर येत आहेत. जास्तीत जास्त कलांचा अंतर्भाव करून रंगमंचावरील नाटय़ फुलविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या एकांकिका. त्यांच्यातून विविध कलागुणदर्शन होत असल्याने या कार्यक्रमाचे नाव ‘कोलाज’ असे ठेवण्यात आले असून, तो येत्या ६ जून रोजी मुंबई आणि ठाण्यातील प्रेक्षकांना पाहावयास मिळणार आहे.   
या कार्यक्रमात पुण्यातील फिरोदिया करंडक स्पर्धेतील विजेत्या संघांनी सादर केलेल्या ‘व्हेलॉसिटी व्हेंचर्स’ आणि ‘स्पेशल व्हिजन’ या दोन एकांकिका पाहावयास मिळणार आहेत. मुंबईकर प्रेक्षकांसाठी शनिवारी दुपारी ४ वाजता माटुंग्यातील यशवंत नाटय़मंदिरात, तर रात्री साठेआठ वाजता ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात हा कार्यक्रम सादर होणार आहे.
या विषयी बोलताना सुनील बर्वे यांनी सांगितले : ‘‘सूर्याची पिल्ले, लहानपण देगा देवा, हमीदाबाईची कोठी, आंधळं दळतंय आणि झोपी गेलेला जागा झाला या पाच नाटकांचा हर्बेरियम उपक्रम २०१२ मध्ये संपल्यानंतर नवीन काय करायचे याचा आम्ही विचार करीत होतो. त्याच दरम्यान गेल्या वर्षी पुण्यातील फिरोदिया करंडक या एकांकिका स्पर्धेसाठी मी परीक्षक म्हणून गेलो होतो.
तेथे दिवसभरात महाविद्यालयीन मुलांनी सादर केलेल्या त्या एकांकिका पाहून मी थक्कच झालो. या एकांकिकांमध्ये फक्त गोष्ट, अभिनय, नाटय़विष्कार  एवढेच नव्हते, तर जास्तीत जास्त कलांचा अंतर्भाव करून ते नाटय़ फुलवले होते. त्या एकांकिका पाहून वाटले, ‘सुबक’ अंतर्गत या स्पर्धेतील नाटकांचे प्रयोग मुंबईत करावेत. त्यानुसार पुण्यातील ‘ड्रिम्स २ रियालिटी’ या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन या वर्षीच्या फिरोदिया करंडक विजेत्या संघाचा पाठपुरावा करून ‘व्हेलॉसिटी व्हेंचर्स’ आणि ‘स्पेशल व्हिजन’ या एकांकिका मुंबई आणि ठाण्यातील प्रेक्षकांसाठी आयोजित करायच्या असे ठरविले.’’ येत्या शनिवारी त्या पाहण्याची संधी रसिकजनांना लाभणार आहे.