News Flash

मुख्यमंत्र्यांआधी कामगिरी जाहीर करण्याचे शिवसेना मंत्र्यांचे ‘उद्योग’

राज्य सरकारच्या द्विवर्षपूर्तीला अजून महिनाभराचा अवकाश असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याआधीच चपळाई दाखवून शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या विभागाची दोन वर्षांची कामगिरी जाहीर करण्याचा

उद्योगमंत्री सुभाष देसाई. (संग्रहित)

राज्य सरकारच्या द्विवर्षपूर्तीला अजून महिनाभराचा अवकाश असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याआधीच चपळाई दाखवून शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या विभागाची दोन वर्षांची कामगिरी जाहीर करण्याचा ‘उद्योग’ शुक्रवारी केला. उद्योग विभागाची धुरा प्रामुख्याने मुख्यमंत्रीच वहात असल्याने देसाई यांनी घाईघाईने महिनाभर आधीच आपल्या विभागाची कामगिरी जाहीर करून मुख्यमंत्र्यांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी सत्तेवर आले आणि डिसेंबरमध्ये शिवसेना सरकारमध्ये सामील झाली. त्यामुळे राज्य सरकारची वर्षपूर्ती झाली, तेव्हा ही भाजपच्या सरकारची वर्षपूर्ती आहे, शिवसेनेची नाही, असा पवित्रा शिवसेनेच्या काही मंत्र्यांनीही घेतला होता. शिवसेनेच्या सत्तेतील सहभागाच्या वर्षपूर्तीचे कार्य अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आले होते. पण द्विवर्षपूर्तीच्या वेळी सुभाष देसाई यांनी सर्वाधिक चपळाई दाखवीत महिनाभर आधीच आपल्या खात्याची कामगिरी सादर केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना पत्र पाठवून आपल्या खात्याचे जास्तीत जास्त पाच महत्त्वाचे निर्णय व योजनांची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारच्या कामगिरीचा आढावा घेणारी पुस्तिका द्विवर्षपूर्तीला काढली जाणार आहे. पण त्याआधीच देसाई यांनी चपळाई दाखवीत आपल्या विभागाच्या कामगिरीचे प्रदर्शन केले आहे.

उद्योग विभाग देसाई यांच्याकडे असला तरी कारभार प्रामुख्याने मुख्यमंत्रीच चालवितात. मेक इन इंडिया, आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी करारमदार, विदेशात होणाऱ्या परिसंवाद, चर्चा आणि अन्य महत्त्वाच्या बाबी मुख्यमंत्री फडणवीस यांनीच पार पाडल्या. त्यात त्यांनी उद्योगमंत्र्यांना फारसा वाव दिला नाही. उद्योग, जलसंधारण व अन्य काही खात्यांच्या महत्त्वाच्या निर्णयांचे व योजनांचे श्रेय त्या खात्याच्या मंत्र्यांना न मिळता मुख्यमंत्री फडणवीस यांना अधिक मिळाले. त्यामुळे यावेळी देसाई यांनी मुख्यमंत्र्यांवर कुरघोडी करीत सर्वात आधी आपल्या खात्याची कामगिरी मांडली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2016 2:08 am

Web Title: subhash desai
Next Stories
1 मराठा समाजाचा मुंबईतील मोर्चा दिवाळीनंतर
2 माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न
3 पुनर्विकासाला नवीन बळकटी!
Just Now!
X