उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे बँकांवर आसूड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हजारो कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा करून दोन जण नुकतेच परदेशात पळून गेले. त्यांना कर्ज देताना बँकांना कसलाही संशय आला नाही, कसलेही प्रश्न पडत नाहीत. त्यांना पायघडय़ा घातल्या जातात. मात्र पतपुरवठय़ाची खरी गरज आहे अशा सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना प्रश्न विचारून, त्यांच्या क्षमतेवर शंका उपस्थित करून हैराण केले जाते, असे खडेबोल उद्योग सुभाष देसाई यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेतील परिसंवादात मंगळवारी बँकांना सुनावले. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग उपक्रमांना वित्तपुरवठा करण्यासाठी बँकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहनही देसाई यांनी केले.

मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत मंगळवारी ‘एमएसएमई- द नेक्स्ट जनरेशन वेल्थ क्रिएटर्स’ हा परिसंवाद झाला. त्यात देसाई बोलत होते. शिवसेनेने केंद्र सरकारच्या धोरणांवर नेहमीच टीका केली आहे. तोच धागा कायम ठेवत राष्ट्रीय बँकांचे कर्ज बुडवलेले नीरव मोदी व विक्रम कोठारी यांचे नाव न घेता देसाई यांनी बँक व्यवस्थापनाच्या मानसिकतेवर टीका केली. या परिसंवादात येस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमीत गुप्ता, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य व्यवसाय अधिकारी के. हरी, ऑटोमोटिव्ह सिस्टीमचे संचालक ऋषी बागला, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचे संचालक यशराज एरंडे, बडवे ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे, केमट्रॉल कंपनीचे संस्थापक के. नंदकुमार आदींनी भाग घेतला.

देशातील एकूण सूक्ष्म, लघू व मध्यम (एमएसएमई) उद्योगांच्या संख्येपैकी एकटय़ा महाराष्ट्रात एमएसएमईचे प्रमाण २२ टक्के असून त्यांच्या साहाय्याने महाराष्ट्र एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न साकार करेल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. राज्याने नुकतेच वस्त्रोद्योग, लॉजिस्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, फिनटेक अशी अनेक धोरणे आणली आहेत आणि ही सर्व धोरणे एमएसएमईस्नेही असल्याचेही देसाई यांनी नमूद केले.

या वेळी यशराज एरंडे यांनी एमएसएमई क्षेत्रातील सद्य:स्थितीची माहिती देणारे सादरीकरण केले, तर येस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमीत गुप्ता यांनी एमएसएमईसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. येस बँकेने मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार केला असल्याची माहिती दिली. महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण हे उद्योगस्नेही असल्याने लघू व मध्यम उद्योगवाढीला वाव आहे, असे नमूद करत श्रीकांत बडवे यांनी स्वानुभावाद्वारे यशस्वी उद्योजक होण्यासाठी मेहनत, संयम व चिकाटी या गुणांची आवश्यकता असल्याचे सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhash desai comment on magnetic maharashtra
First published on: 21-02-2018 at 01:55 IST