‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’तील दाव्यांवरून विरोधकांची जोरदार टीका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारेमाप घोषणा करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणजे ‘चुंबकीय’ महाराष्ट्राच्या नावे बेरोजगारांचा राग कमी करण्यासाठी लाखो कोटींच्या गुंतवणुकीची व ३६ लाख रोजगार निर्माण करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली, तर, ‘मेक इन महाराष्ट्र’ प्रकल्प राबविण्यात अपयशी ठरल्यामुळेच ‘मॅग्नटिक महाराष्ट्र’च्या आयोजनाची वेळ आल्याची टीका माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. मोठय़ा घोषणांतून मोठी फसवणूक करण्याचे सरकारचे सूत्र असल्याचे विरोधकांनी सांगितले.

‘मेक इन महाराष्ट्र’च्या आयोजनाच्या वेळी आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. यातून पंधरा लाखाहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल अशा बाता मारण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात केवळ ३५ हजार कोटी रुपयांचीच गुंतवणूक आल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाल्याचे मुंडे म्हणाले. त्यापूर्वी २०१५ मध्ये फॉक्सकॉनची ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आणि ५० हजार रोजगार निर्मिती होणार असे सांगितले गेले. आताही मॅग्नेटिक महाराष्ट्रात ३६ लाख रोजगाराची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. स्किल डेव्हलपमेंटमधूनही लाखोंची रोजगार निर्मिती झाल्याचे चित्र रंगविण्यात आले होते. मोठी स्वप्ने, मोठय़ा घोषणा आणि मोठी फसवणूक हेच सूत्र मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्येही आहे.

‘मेक इन महाराष्ट्र’ राबविण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरल्यामुळेच मॅग्नेटिक महाराष्ट्र प्रकल्प हाती घ्यावा लागला असून मेक इन महाराष्ट्रमध्ये जाहीर करण्यात आलेली कंपन्यांची व रोजगारांची आकडेवारी खोटी असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. गेल्या चार वर्षांत राज्यातील अनेक कंपन्या गुजरातमध्ये गेल्या असून राज्यातील तरुणांचा मोठा रोजगार यातून बुडाल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. राज्यातील तरुणांना रोजगार नसल्यामुळे मोठय़ा प्रमाणात नैराश्य निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

गेल्या साडेतीन वर्षांत राज्य सरकारकडून अतिरंजित दावे, जुमलेबाजी, खोटी आकडेवारी, फसव्या घोषणा याशिवाय राज्याला काही मिळाले नाही. फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्याची परिस्थिती मॅग्नॅटिक नव्हे तर ‘पॅथॅटिक’ झाल्याची टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

मॅग्नेटिक महाराष्ट्रात जे बारा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत त्याची अंमलबजावणी येत्या दोन ते पाच वर्षांत पूर्ण झालेली दिसेल. मेक इन महाराष्ट्रमध्ये झालेल्या गुंतवणूक करारापैकी ६१ टक्के गुंतवणूक प्रत्यक्षात आली असून एकूण सहाशेहून अधिक भूखंड देण्यात आले. सातशेहून अधिक कंपन्यांची कामे सुरू झाली आहेत. मॅग्नेटिक महाराष्ट्रात जेवढे सामंजस्य करार झाले त्यापैकी जवळपास ७५ टक्के करार प्रत्यक्षात येतील. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गेल्या पंधरा वर्षांच्या काळात राज्यातील उद्योगांची पिछेहाट झाली एवढेच नव्हे तर त्यावेळच्या मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांनी योग्य लक्ष न दिल्यामुळेच राज्यातील उद्योग राज्याबाहेर गेले. मात्र, येत्या काळात मुंबईत बीकेसीमध्येच आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र आम्ही बनवून दाखवू.   -सुभाष देसाई, उद्योगमंत्री

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhash desai comment on magnetic maharashtra
First published on: 22-02-2018 at 02:17 IST