एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची चौकशी अप्पर मुख्य सचिव के.पी. बक्षी करणार आहेत हे स्पष्ट झाले आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या एम पी मिल कंपाऊंड एसआरए घोटाळ्याची चौकशी लोकायुक्तांमार्फत करण्याचा निर्णय झाला तेव्हापासूनच सुभाष देसाई यांची चौकशी कोण करणार हा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.

एमआयडीसी घोटाळा जाहीर झाल्यानंतर याप्रकरणी चौकशी होणारच हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते, त्यानंतर लगेचच सुभाष देसाई यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, जो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला नाही. १५ ऑगस्टच्या आधीपासूनच एमआयडीसी घोटाळा प्रकरणी सुभाष देसाई यांची चौकशी कोणातर्फे होणार हे स्पष्ट झालेले नव्हते. मात्र अप्पर सचिव के. पी. बक्षी हे त्यांची चौकशी करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?
एमआयडीसीसाठी घेतलेली इगतपुरी जवळची सुमारे ४ हजार कोटींची ४०० एकर जमीन सुभाष देसाई यांनी शिवसेनेच्या जवळच्या विकासकाला दिली असा आरोप त्यांच्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. या प्रकरणी न्यायालयीन चौकशी व्हावी आणि सुभाष देसाई यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी सुभाष देसाई यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.