विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची मागणी मान्य; अन्य शाखांना फटका

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विज्ञान शाखेच्या परीक्षा पुढे ढकलत ‘निवेदन द्या आणि परीक्षा पुढे ढकला’ असा अलिखित पायंडा मुंबई विद्यापीठाने घातला आहे. अभ्यासक्रमाचा कार्यकाल पूर्ण न झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्याच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विद्यापीठाने गुरुवारी या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मात्र उर्वरित कला आणि वाणिज्य शाखेच्या परीक्षांचा सारासार विचार न करता ढकलेल्या या परीक्षांमुळे ‘निवेदन द्या, आणि परीक्षा पुढे ढकला’ असा संदेश विद्यापीठाने दिला आहे.

विद्यापीठाने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून या परीक्षा सुरू होणार आहेत. संगणकाधारित मूल्यांकनामुळे रखडलेले निकाल, उशीरा सुरू झालेली पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया यामुळे या अभ्यासक्रमांचे जेमतेम ५० दिवस पूर्ण झाले आहेत.

अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी विज्ञान शाखेचे विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानुसार विद्यापीठाने या परीक्षा जवळपास महिनाभराने पुढे ढकलत असल्याचे गुरुवारी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

नियमानुसार  परीक्षा होण्याआधी अभ्यासक्रमाचे वर्ग किमान ९० दिवस भरणे बंधकारक आहे. हा नियम जसा विज्ञान शाखेला लागू आहे तसाच तो इतर शाखांनाही लागू आहे. विज्ञान शाखेप्रमाणेच कला आणि वाणिज्य शाखेचे प्रवेशही नोव्हेंबरपर्यत सुरू होते. त्यामुळे या अभ्यासक्रमाचे वर्गही परीक्षेआधी जेमतेम ५० दिवस भरणार आहेत. विद्यापीठाने मात्र विद्यार्थी संघटनांनी केलेल्या मागणीप्रमाणे केवळ विज्ञान शाखेच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना मात्र विद्यापीठाच्या अविचारी धोरणामुळे चांगलाच फटका बसणार आहे.

वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असल्याने हे निकाल ऑक्टोबरपर्यत जाहीर होत होते. त्यामुळे विद्यार्थी नोव्हेंबरपर्यत प्रवेश घेत होते. आता वाणिज्य शाखेचे तर ५० दिवसही जेमतेम भरणार नाहीत आणि अभ्यासक्रमही शिकवून झालेला नाही. असे असताना केवळ विज्ञान शाखेचा विचार करून विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. वास्तविक पदव्युत्तर परीक्षांबाबतचा हा घोळ  विद्यापीठाच्या लक्षात येणे गरजेचे होते. मात्र दरवेळेस चूक दाखवून दिल्यानंतर सुधारणा करण्याची विद्यापीठाला सवय झाली आहे. चूक लक्षात आल्यानंतर तरी ती सर्वागीण विचार करून सुधारण्याची वृत्ती परीक्षा भवनातल्या अधिकाऱ्यांची नाही, हेच यावरून स्पष्ट होत असल्याचे दक्षिण मुंबईतील एका महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या प्राध्यापकांनी व्यक्त केले आहे.