टाळेबंदीआधी एक काळ असा होता की मालिका, दूरचित्रवाहिनी आणि चित्रपट ही तिन्ही माध्यमे एकाच अभिनेत्याने व्यापून टाकली होती. त्याच्या ‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेचे शीर्षक हे जणू प्रेक्षकांच्या मनातले भाव होते की काय.. इतक्या प्रभावीपणे अभिनेता सुबोध भावेचा चेहराच प्रेक्षक विविध माध्यमांमधून आणि विविध भूमिकांमधून अनुभवत होते. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि अभ्यासू कलाकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेता सुबोध भावे यांच्याशी ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या कार्यक्रमात गप्पाष्टक रंगणार आहे.

‘लोकमान्य – एक युगपुरुष’, ‘बालगंधर्व’, ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटांमधून सुबोध भावे यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरल्या.

दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्यावर आधारित चरित्रपट साकारणे हे कोणत्याही कलाकारासाठी मोठे आव्हान असते. हे आव्हान सुबोधने तिन्ही चरित्रपटांतून लीलया पेलले आणि तो प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरला. मात्र त्याच भूमिकांमध्ये अडकून न पडता सातत्याने विविध भूमिका आणि विषयांवरील चित्रपट करत अभिनेता म्हणून आपले नाणे त्याने खणखणीत वाजवले. सुबोधची आजवरची वाटचाल १० जुलैला सायंकाळी ५ वाजता ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या वेबसंवादातून उलगडणार आहे.

अभिनय प्रवास.. पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर आयटी कंपनीतून सुरू झालेला त्याचा प्रवास आता मुंबईत येऊन अभिनयाच्या क्षेत्रात स्थिरावला आहे. मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ परत आणण्याचा उद्देश मनात ठेवून पुढे जाणाऱ्या या कलाकाराने लेखन आणि दिग्दर्शनातही स्वत:ला सिद्ध केले. एकीकडे कलाकार म्हणून नव्या-जुन्या दिग्दर्शकांबरोबर काम करत असताना ‘अश्रूंची झाली फुले’, ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘स्थळ स्नेहमंदिर’, ‘कळा या लागल्या जीवा’सारख्या नाटकांमधूनही त्याने काम केले आहे. समाजमाध्यमांपासून चित्रपट माध्यमापर्यंत सर्जनशील प्रक्रियेशी जोडून घेत कार्यरत असलेला सुबोध कलाकार म्हणून सामाजिक बांधिलकीही कायम जपत आला आहे. त्याच्या या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेणारा हा गप्पांचा भावे प्रयोग ‘सहज बोलता बोलता’ या कार्यक्रमातून रंगणार आहे.

सहभागी  होण्यासाठी.. https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_10July  या लिंकवर नोंदणी आवश्यक.