ज्या मराठी मुलांसाठी, मराठी माणसांसाठी त्यांच्या हक्कांसाठी बाळासाहेब ठाकरे भांडले त्या मराठी मुलांना कामच करायचं नाही असं म्हणत अभिनेता सुबोध भावे याने त्याच्या मनातले परखड विचार बोलून दाखवले. कलर्स मराठी या वृत्तवाहिनीवर शुक्रवारपासून दोन स्पेशल या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात सुबोध भावे आणि सुमित राघवन या दोघांची मुलाखत अभिनेता जितेंद्र जोशीने घेतली. एकंदरीत या दोघांचा सिनेसृष्टी, नाट्यसृष्टीमधला प्रवास याबाबत चर्चा झाली. या कार्यक्रमात फोटोपे ऐसी बात हा एक राऊंड होता. या राऊंडमध्ये जो फोटो समोर येईल त्याच्या समोर आपल्या मनातली बाब बोलून दाखवायची असा नियम होता. सुबोध भावेने बाळासाहेब ठाकरेंचा फोटो समोर येताच त्याच्या मनातली खंत परखडपणे बोलून दाखवली.

काय म्हणाला सुबोध भावे?

“शिवसेनेने शिवउद्योग सेनेची स्थापना केली होती. मी तेव्हा कॉलेजमध्ये होतो आणि नोकरीही करत होतो. वेगवेगळ्या नोकऱ्या करताना मी एक दिवस शिवउद्योग सेनेमध्ये नोकरी करु लागलो. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाणं आणि आपल्याकडे ज्या मराठी मुलांनी अर्ज भरला आहे त्या मुलांना तिकडे पाठवणं. त्यासाठी अनेक इंडस्ट्रीजमध्ये तेव्हा फिरत असे. शिवउद्योग सेनेत ज्यांनी अर्ज केला आहे अशा मुलांना कोणत्या कंपनीत नोकरी लागते आहे ना? हे बघायचं काम मी करत असे. त्या काळात मला असं वाटायचं की जी परिस्थिती मी खूप जवळून बघितली होती ती परिस्थिती तुम्हाला पत्राद्वारे कळवावी.”

“ज्या मराठी मातीसाठी, ज्या महाराष्ट्रातल्या तरुण मुलांसाठी तुम्ही हे सगळं करत आहात त्यांना मुलांना कामच करायचं नाही. आज मराठी माणसांना नोकरी मिळावी म्हणून तुम्ही प्रयत्न केलेत. तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून त्यांना ७०-८० टक्के जागा ठेवल्या. तुम्ही मराठी कलाकार, मराठी नाटक, मराठी चित्रपट यांसाठी हक्काने उभे राहिलात. कितीतरी गोष्टी तुम्ही आजपर्यंत केल्या. ज्या मराठी मुलांना नोकरी मिळावी म्हणून तुम्ही शिवउद्योग सेनेची स्थापना केलीत, त्याच शिवसेनेच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना नोकरी  मिळाली, त्यांना एका आठवड्यानंतर भेटायला म्हणून गेलो तेव्हा तिथल्या मालकांनी मला असं सागितलं की, तुम्ही आणलेली मुलं दुसऱ्या दिवशीच पळून गेली. त्यांना टेबल खुर्चीचे जॉब करायचे आहेत. अनेक मराठी मुलांसाठी तुम्ही आवाज उठवलात. मात्र त्यांना खरंच कामाची किती गरज होती ? हे तुम्ही तपासाया हवं होतंत. तुम्ही खूप मनापासून करत होतात, मात्र मराठी मुलांना कामच करायचं नाही त्याचं तुम्ही कराल?” प्रश्न सुबोध भावेने बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोला विचारला.

या कार्यक्रमात इतरही गप्पा झाल्या. मात्र फोटोपे ऐसी बात या सेशनमध्ये सुबोध भावेने बाळासाहेब ठाकरेंना काय सांगावंसं वाटतं ते बोलून दाखवलं.