लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांची वर्णी लागली आहे.
देशात तणावाचे वातावरण असताना महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्त पदासारखी महत्त्वाची पदे रिक्त ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्यामुळे आज(दि.28) तात्काळ ही पदे भरण्यात येणार आहेत.
संजय बर्वे हे 1986 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्यगुप्त वार्ता विभागाचे प्रमुख पद त्यांनी भूषवले होते. तर, सुबोध कुमार जैस्वाल हे 1985 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या कारकिर्दीला या महिनाअखेरीस पूर्ण विराम मिळणार असल्याने, मुंबईचे आयुक्त सुबोध जयस्वाल हे त्या पदाची धुरा सांभाळणार हे निश्चित झाले होते. त्यामुळे त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमबीर सिंह व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची नावं आघाडीवर होती. अखेर बर्वे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी आणि सुबोध जयस्वाल यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2019 11:53 am