राजीव गांधी दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान जर झाले असते तर त्यांनी अयोध्या येथे राम मंदिराची उभारणी केली असती, असे वक्तव्य भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मुंबईत राम मंदिरावर झालेल्या एका परिसंवादादरम्यान केले.

नेहरू-गांधी घराण्याचे टिकाकार असलेल्या स्वामी यांनी अयोध्या प्रश्न सोडविण्यासाठी राजीव गांधी यांनी केलेल्या प्रयत्नांचा या वेळी आवर्जून उल्लेख केला. या वक्तव्याने स्वामींनी नकळत काँग्रेसवर आपला निशाणा साधला.  ते पुढे म्हणाले की, मी राजीव गांधींना ओळखत होतो, ते पुन्हा एकदा जर देशाचे पंतप्रधान झाले असते तर, त्यांनी त्याच जागी राम मंदिर बांधले असते. राजीव गांधींनी राम मंदिराच्या जागी शिलान्यास करण्याची परवानगी दिल्याचाही त्यांनी उल्लेख केला. अयोध्या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाकडून येणाऱ्या अंतिम निकालाने राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी आशाही स्वामी यांनी व्यक्त केली.