“अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील मंदिर अनेक परकीय आक्रमकांनी वारंवार पाडले. केवळ श्रीराम मंदिर नव्हे तर भारतातील अशी सुमारे ४० हजार मंदिरे मुस्लीम आक्रमकांनी पाडली. लवकरात लवकर अयोध्येतील श्रीराममंदिर, मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर आणि वाराणसी येथील काशीविश्वनाथ ही तीनही मंदिरांचा मूळ स्वरुपात जीर्णोद्धार व्हावा अन्यथा आम्ही गमावलेली सर्व चाळीस हजार मंदिरे परत मिळवू”, असे खडे बोल राज्यसभेतील खासदार व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आज एका प्रकट कार्यक्रमात मंदिरविरोधकांना सुनावले. दादर येथील हिंदू नववर्ष स्वागत समिती  आयोजित ‘नव्या भारताची संकल्पना – आर्थिक व सामाजिक दृष्टीकोन’ या विषयावरील मंथन या उपक्रमाअंतर्गत आज रवींद्र नाट्यमंदिर येथे डॉ. स्वामी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

स्वामी पुढे म्हणाले, “पुरावे मिळाल्यास वादग्रस्त भूमी मंदिरासाठी उपलब्ध करून देऊ असे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी म्हटले होते. तसेच मशीद हा इस्लामचा अविभाज्य घटक नसल्याचा निर्वाळा १९९४ साली सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मशीद ही आवश्यकतेनुसार एका जागेवरून हलवता येते, असे अन्य देशांतील पुरावे इंटरनेटवरही उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणताही संदेह न बाळगता शासनातर्फे लवकरात लवकर ही वादग्रस्त जमीन ताब्यात घेऊन प्रभू श्रीरामांचे मंदिर उभे केले जावे.”

आज भारताला एका नव्या आर्थिक विचारांची आवश्यकता असल्याचे डॉ. स्वामी यांनी नमूद केले. ते म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर आपण विकासासाठी सोव्हिएत रशियाचे आर्थिक मॉडेल स्वीकारले. मात्र, आपल्या पद्धतीनुसार ते तयार केले नाही. आपल्याकडे तीन ऋतुंमध्ये पीक घेण्याची सोय आहे. त्यसाठी अनेक नैसर्गिक अनेक स्रोतही उपलब्ध आहेत. उत्पादनासाठी या स्रोतांचा नियोजित वापर झाला पाहिजे. भारतीय गायीच्या दुधाला जागतिक पातळीवर वाखाणले जाते. भारतीय गायीच्या दुग्धउत्पादनाला अधिक प्रोत्साहन दिले तर या दुधाची व दुग्धजन्य पदार्थांची जास्त निर्यात करता येईल. आज पंतप्रधानांनी मुद्रा, स्टार्टअप सारख्या अनेक नव्या योजना सुरु केल्या आहेत. त्याचा लाभ घेऊन येथील उत्पादकांनी जास्तीत जास्त उत्पादन केले पाहिजे. कोळशाचा लीलाव पूर्ण क्षमतेने केला गेला तर त्याचाही फायदा शासनाला होऊ शकतो. तसेच प्राप्तीकर रद्द केल्यास त्या पैशाचा वापर लोक गुंतवणुकीत करू शकतील.”

(हे प्रसिद्धीपत्रक विश्व संवाद केंद्राने जारी केले आहे.)