राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ५०० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. पन्नास क्विंटलपर्यंत हे अनुदान देण्यात येणार असून याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मान्यता दिली.

सन २०१९-२० या हंगामातील धान उत्पादकांसाठी केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. तथापि धान उत्पादनाच्या खर्चात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने अनुदान देण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार आदींनी मुख्यमंत्र्यांकडे केली

होती. त्यानुसार राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना पन्नास क्विंटलच्या मर्यादेत प्रति क्विंटल ५०० रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, भंडारा जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक विम्याच्या रकमेचे वाटप १२ डिसेंबर रोजी लाखांदूर येथे शेतकरी मेळावा घेऊन करावे, असे आदेश विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी येथे विमा कंपनीला दिले. विधान भवनात भंडारा जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेच्या वितरणाबाबत झालेल्या बैठकीत हे आदेश दिले.

भंडारा जिल्ह्य़ातील एक लाख ६१ हजार ३४३ धान उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. त्यांनी पाच कोटी ४३ लाख रुपये विम्याच्या हप्त्यापोटी जमा केले. आता या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी ६७ कोटी ८६ लाख रुपये मिळणार आहेत. प्रति हेक्टरी ही रक्कम नऊ हजार रुपये असेल अशी माहिती विमा कंपनीच्या प्रतिनिधीने दिली.