वसई-दिवा रेल्वे मार्गाला उपनगरी रेल्वेचा दर्जा देण्यात आल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सुमारे हजारो प्रवाशांना आता उपनगरी रेल्वेच्या सुविधांचा लाभ मिळणार आहे. मात्र भाडेही वाढणार आहे.
मध्य रेल्वेचे दिवा स्थानक १८७७ मध्ये सुरू झाले. १९६४ पासून वसई-दिवा मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू झाली. १९९४ मध्ये ‘डेमू’ गाडय़ांमधून या मार्गावर वाहतूक सुरू झाली. सध्या या मार्गावर मेमू आणि डेमू गाडय़ांमधून प्रवासी वाहतूक सुरू आहे. या मार्गावर प्रवास करताना प्रवाशांना परतीचे तिकीट मिळण्याची सुविधा नव्हती. आता उपनगरी रेल्वेचा दर्जा मिळाल्यामुळे प्रवाशांना मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावरील कोणत्याही स्थानकावरून वसई-दिवा मार्गावरील स्थानकांचे तिकीट मिळू शकेल. मात्र, पनवेल ते वसईपर्यंतचे प्रवासी भाडे पाच रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.