वाहतूक कोंडीसह उड्डाणपुलांच्या कामांचा अडथळा

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांसाठी उपनगरी रेल्वे सेवा खुली नसल्याने गेल्या दोन महिन्यांत रस्त्यावरील वाहतुकीवर प्रचंड ताण येत आहे. एकीकडे वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण झालेले असताना उड्डाणपुलांच्या कामांमुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांचा सामना त्यांना करावा लागत आहे. एकू ण परिस्थितीमुळे रस्ते मार्गे प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचे हाल होत आहेत.

मानखुर्द ते वांद्रे-कुर्ला संकुल अथवा पश्चिम द्रुतगती मार्गापर्यंतच्या सकाळ आणि सायंकाळच्या प्रवासास तीन ते चार तास खर्ची पडत आहेत, तर पूर्व द्रुतगती मार्गावरून येणाऱ्या वाहनांना घाटकोपर येथे जाण्यासाठी अशीच वाहतूक कोंडी अनुभवास येत आहे. मानखुर्द ते घाटकोपर लिंक रोड आणि सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) वांद्रे-कुर्ला संकुलास जोडला जातो. या दोन ठिकाणी सर्वाधिक वाहतूक कोंडीचा त्रास होत असल्याचे या रस्त्यावरून दररोज प्रवास करणारे प्रवासी संदीप घन यांनी सांगितले. सकाळी अंधेरीच्या दिशेने कामावर जाताना तुलनेने कोंडी कमी असते. मात्र सायंकाळच्या या टप्प्यातील प्रवासास किमान दोन तास लागतात. या मार्गावरील वाहतूक कोंडी वाहनांची संख्या वाढल्यामुळे नाही तर घाटकोपर ते मानखुर्द आणि कुर्ला येथील उड्डाणपुलांच्या अर्धवट कामांमुळे होत असल्याचे घन यांनी नमूद केले.

मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम गेल्या चार वर्षांपासून पालिकेमार्फत सुरू असून त्या निविदेमध्ये दोन वेळा बदल करण्यात आले. मूळ कार्यादेश जानेवारी २०१७चा असून त्यानुसार जुलै २०१९ पर्यंत काम होणे अपेक्षित होते. त्यामध्ये अतिरिक्त व अधिक कामाचा दोन वेळा अंतर्भाव करून ऑक्टोबर २०२० पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. दरम्यान, या कंत्राटाची मूळ किंमत ५७६.६० कोटींवरून ७१३.४९ कोटी झाली.

मात्र या काळात उड्डाणपुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून त्यामुळे लिंक रोडवरील केवळ दोन मार्गिकाच वाहतुकीसाठी उपलब्ध आहेत. त्यातही उड्डाणपुलाजवळील संपूर्ण रस्ता खराब झाल्याने वाहतूक कोंडीत भरच पडते. सध्या पूर्व मुक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांची संख्याही वाढली असून या रस्त्यावर वाहनेदेखील वाढली आहेत.

घाटकोपर येथे आल्यानंतर छेडा नगर उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे काम एमएमआरडीएतर्फे हाती घेण्यात आले आहे. हे कामहीदोन वर्षांपासून रखडले असून येथे पूर्व द्रुतगती मार्गावरून येणाऱ्या वाहनांचीही भर पडते आणि प्रवास आणखी रखडतो. एससीएलआर कुर्ला पश्चिमेला जेथे संपतो त्या ठिकाणी त्याचे पश्चिम द्रुतगती मार्गावर वाकोला जंक्शनपर्यंत विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी चार पदरी उड्डाणपूल बांधला जात आहे.  परिणामी येथे किमान अर्धा तास वाया जात आहे.

पावसामुळे अडचण

पूर्व द्रुतगती मार्गावरून वेगाने येणाऱ्या वाहनांना सध्या घाटकोपर पूर्वेकडे जाणाऱ्या चौकातील उड्डाणपुलाच्या कामाचा अडथळा होत आहे. या पुलावरील मुंबईहून येणारी मार्गिका सुरू असून दुसऱ्या मार्गिकेचे काम रखडले आहे. टाळेबंदीत हे काम पूर्णत: बंद होते, तर त्यानंतर पावसामुळे कामाची सुरुवात होऊ शकली नाही. पुलावरील कामासाठी पाऊस नसणे गरजेचे असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.