करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीमुळे पश्चिम आणि मध्य उपनगरीय रेल्वेला आतापर्यंत तब्बल १ हजार २० कोटी रुपयांच्या प्रवासी उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. गेल्या आठ महिन्यांत या दोन्ही विभागांच्या तिजोरीत अवघे ५२ कोटी रुपये जमा झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
करोनामुळे २२ मार्चपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली. सुरुवातीला फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच लोकल धावत होती. त्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता प्रवासाची मुभा देण्यात आली. आता विविध श्रेणीतील कर्मचारी आणि सर्व महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल मात्र अद्याप खुली झालेली नाही. त्यामुळे उपनगरीय मार्गावर सेवा देताना मध्य आणि पश्चिम रेल्वेला मोठय़ा तोटय़ाला सामोरे जावे लागत आहे. या तोटय़ाने आता एक हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
दरवर्षी एप्रिल ते नोव्हेंबपर्यंत मध्य रेल्वेला उपनगरीय सेवेतून साधारण ५०२ कोटी रुपये प्रवासी उत्पन्न मिळते. यंदा फक्त २२ कोटी रुपये उत्पन्न मिळाले असून, ४८० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कर्जत, खोपोली, हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर मिळून ९० टक्क्यांपेक्षाही अधिक लोकल फेऱ्या सुरू झाल्या आहेत. परंतु प्रवासी संख्या ६ लाखच आहे. लोकल सामान्यांसाठी पूर्णपणे खुली न झाल्याचा हा फटका असल्याचे सांगण्यात आले.
पश्चिम रेल्वेलाही गेल्या आठ महिन्यांत ३० कोटी ६५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर ५४० कोटी ९ लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील ६ लाख ४२ हजार ५०१ प्रवासी प्रवास करत असून ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोकल फेऱ्या सध्या धावतात.
* मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सध्या दररोज २७८१ लोकल फेऱ्या धावतात. यात मध्य रेल्वेवरील १५८० (टाळेबंदीआधी १७०० पेक्षा जास्त फेऱ्या) आणि पश्चिम रेल्वेवरील १२०१ फेऱ्यांचा (टाळेबंदीआधी १३६७ फेऱ्या) समावेश आहे.
* या दोन्ही मार्गावर दर दिवशी एकूण ८० लाख प्रवासी प्रवास करत होते. आता हीच संख्या १२ लाखांच्या आसपास आहे.
‘तेजस्विनी’ पथकाकडून कारवाई
विनातिकीट प्रवास करणाऱ्या पाच हजारांहून अधिक महिला प्रवाशांवर मध्य रेल्वेच्या ‘तेजस्विनी’ महिला तिकीट तपासनीसांनी कारवाई केली आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२० पर्यंत तेजस्विनी पथकाने ५ हजार ११९ विनातिकीट प्रवासी पकडले असून, १३ लाख १८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ऑगस्ट २००१ मध्ये ‘तेजस्विनी’ तिकीट तपासणी पथक स्थापन करण्यात आले. मध्य रेल्वे उपनगरीय स्थानकात आणि महिला डब्यात विनातिकीट प्रवासी आणि अनियमितता शोधण्यासाठी हे पथक कार्यरत झाले. २०१९-२० या आर्थिक वर्षांत तेजस्विनी पथकाच्या कामगिरीत दंडाच्या बाबतीत २०१८-१९ च्या तुलनेत २४.६९ टक्के वाढ झाली. जवळपास ३ कोटी ४३ लाख रुपये प्राप्त झाले. १ लाख १७ हजार केसेसच्या तुलनेत या वर्षी १ लाख २४ हजार केसेसची नोंद झाली. त्यातच करोनाकाळात सप्टेंबर ते नोव्हेंबपर्यंत विनातिकीटची ५ हजार ११९ प्रकरणेही शोधून काढली आहेत.
प्रवासी वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आणली जात आहे. करोनाकाळात उपनगरीय प्रवासी वाहतुकीत तोटा झाला असला, तरी आमच्या करोना योद्धय़ांनी २४ तास काम करून मालगाडीची वाहतूक मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढविली आहे.
– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 7, 2020 12:00 am