पश्चिम रेल्वेकडून ५, मध्य रेल्वेकडून ८ पथके तयार

एल्फिन्स्टन स्थानकातील पादचारी पुलावर झालेल्या अपघातानंतर रेल्वेमंत्री पीयूश गोयल यांनी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील पादचारी पुलांचे ‘ऑडिट’ (तपासणी) करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून पादचारी पुलांबरोबरच स्थानकातील अन्य सोयिसुविधांचे ३ ऑक्टोबरपासून ऑडिट केले जाणार आहे. यासाठी रेल्वेकडून विविध विभागांतील अधिकाऱ्यांचे पथकही बनवण्यात आले असून त्यांच्याकडून स्थानकांना भेट देऊन आढावा घेतला जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. पाच दिवसांत रेल्वेकडून सर्व माहित गोळा केली जाणार आहे.

एल्फिन्स्टन स्थानकातील पादचारी पुलाच्या अरुंद पायऱ्यांवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत २३ प्रवाशांना प्राण गमवावे लागले. तर ३८ प्रवासी जखमी झाले. याची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्री पीयूश गोयल यांनी सलग दोन दिवस पश्चिम, मध्य रेल्वे, मुंबई रेल्वे विकास महामंडळ, रेल्वे सुरक्षा दल, मुंबई पोलीस, मुंबई पालिका व एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत रेल्वेच्या अनेक मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली.

महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वेच्या सर्व स्थानकातील पादचारी पुलांचे ऑडिट करण्याचे आदेश रेल्वेमंत्र्याकडून बैठकीत देण्यात आले आणि त्याचा अहवाल तयार करण्यास सांगण्यात आला. त्यानुसार पश्चिम आणि मध्य रेल्वकडून सर्व स्थानकांचे ऑडिट ३ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी सांगितले की, अभियांत्रिकी, वाणिज्य विभाग, रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस, पालिकेचे अधिकारी यांची नियुक्ती ऑडिट करण्यासाठी करण्यात आली आहे. अशी पाच जणांची पाच पथके असतील. त्यांच्याकडून स्थानकात गर्दीच्या वेळी भेट देऊन पाहणी केली जाईल.

पादचारी पूल, त्यावरून उतरताना आणि चढताना प्रवाशांना होणारी गैरसोय, पादचारी पुलांना जोडले गेलेले स्कायवॉक, स्थानकातील प्रवेशद्वार इत्यादीची पाहणी या पथकाकडून केली जाणार आहे. गरज असेल तेथे चित्रीकरणही केले जाईल. मध्य रेल्वेकडूनही आठ पथके नेमण्यात आली असून त्यांच्याकडूनही पश्चिम रेल्वेप्रमाणेच ऑडिट केले जाईल, असे सांगण्यात आले. पाच ते सात दिवसांत त्याचा अहवाल तयार केला जाणार असल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

  • मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गात पश्चिम रेल्वेवर ४७ स्थानके असून मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावर ७५ पेक्षा जास्त स्थानके आहेत.
  • पश्चिम रेल्वेकडून एल्फिन्स्टन स्थानकात घडलेल्या घटनेत मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आतापर्यंत १ कोटी २९ लाख १५ हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे.