अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या उपनगरी रेल्वेला (लोकल) मोजक्याच स्थानकांत थांबा दिल्याने मध्य रेल्वेवरील प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सर्व स्थानकांत थांबा देण्यासाठी धीम्या मार्गावरही उपनगरी रेल्वे चालविण्याचा विचार सुरू असून, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीला ४३१ उपनगरी रेल्वे फेऱ्या चालवण्यात येतात. या गाडय़ांना सीएसएमटी, दादर, भायखळा, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, नेरळ, आसनगाव, पनवेल, मानखुर्द, वडाळा, रबाळे, कोपरखैरणे, तुर्भे, जुईनगर, नेरुळ, बेलापूर, वाशी, पनवेल या स्थानकांतच थांबा दिलेला आहे. त्यामुळे मधल्या स्थानकांतील प्रवाशांना त्याचा फायदा होत नाही. लोकल पकडण्यासाठी जवळचे स्थानक गाठावे लागते. परिणामी ज्या स्थानकात थांबा आहे तेथे गर्दी वाढते. त्यामुळे अंतर नियमांचा फज्जा उडतो.

सध्या मध्य रेल्वेवरील एकूण ४३१ फेऱ्यांपैकी सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसारा मार्गावर ३३३ फेऱ्या होतात. यातील आठ फेऱ्या धीम्या मार्गावर चालवण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. याबाबत राज्य सरकारकडून मंजुरीही घेण्यात येणार आहे. सध्या पश्चिम रेल्वेमार्गावर धीम्या मार्गावर उपनगरी रेल्वे चालवण्यात येत आहेत.

यांना परवानगी.. : उपनगरी रेल्वेमधून अधिस्वीकृतीधारक पत्रकार, दिव्यांग आणि कर्करोगग्रस्त रुग्णांनाही प्रवासाची मुभा देण्यात आल्याचे मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. दिव्यांग, कर्करोगग्रस्तांना आरक्षित डब्यातून प्रवास करण्याची परवानगी असेल. त्यांनी प्रवासासाठी ओळखपत्र आणि प्रमाणपत्र जवळ बाळगावे. रेल्वे स्थानकात प्रवेशासाठी पत्रकारांनी राज्य सरकारकडून क्यूआर कोड ई-पास घ्यावा, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.