मुंबई : मासेमारीसाठी निरुपयोगी ठरल्याने समुद्रात फेकून देण्यात येणारी अथवा सागरी प्रवाहात वाहून जाणारी मच्छिमारांची जाळी सागरी जीवांसाठी धोकादायक बनू लागल्याचे उघडकीस आले आहे. अशाच एका नायलॉनच्या जाळ्याचा सात फूट लांबीचा दोरा डहाणू येथील कासव सुश्रूषा केंद्रात उपचारांदरम्यान सागरी कासवाच्या शरीरातून बाहेर काढण्यात आला.  तर पुढील दोन्ही पंखवजा पर तुटल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या कासवांची संख्या यंदा केंद्रामध्ये सर्वाधिक आहे. मासेमारीच्या जाळ्यांमुळे जायबंदी झालेल्या सागरी कासवांचे पोहण्यासाठी आवश्यक असणारे अवयव निकामी झाले असून या सागरी कासवांना कायमचे अपंगत्व आले आहे. शिवाय बोटींमधून गळती होत असलेल्या इंधनामुळे सागरी जीवांचा श्वास कोंडत असल्याचे निरीक्षणातून उजेडात आले आहे. परिणामी सागरी जीवांना धोका निर्माण होत आहे.

मुंबईसह महाराष्ट्राच्या समुद्रात मासेमारी करणारे मच्छीमार बहुतेक वेळा  मासे पकडण्यासाठी वापरलेली जाळी निरुपयोगी झाल्यानंतर समुद्रात फेकून देतात. अनेक वेळा मासे पकडण्यासाठी समुद्रात टाकलेली जाळी सागरातील अंतर्गत प्रवाहांमुळे खोल सागरात वाहून जाते. अशी वाहून गेलेली जाळी किंवा मच्छीमारांनी फेकलेली जाळी सागरतळाशी जाऊन बसते. नेमक्या याच भागात डॉल्फिन, सागरी कासव, व्हेल यांचा अधिवास असल्याने ते या जाळ्यात अडकतात आणि त्यांना मोठय़ा प्रमाणात इजा होते किंवा त्यांचा मृत्यू होतो.

डहाणूतील  ‘सी-टर्टल ट्रीटमेंट अ‍ॅण्ड ट्रान्झिट सेंटर’मध्ये ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या मादी समुद्री कासवांच्या शरीरामधून सात फूट लांबीचा नायलॉनच्या जाळ्याचा दोर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

कासवाच्या शरीरामध्ये सात फुटांच्या नॉयलॉनच्या दोरीचा गुंता झाल्याचे दिसून आल्याची माहिती केंद्राचे पशुवैद्यक डॉ. दिनेश विन्हेरकर यांनी दिली. दोरीला कुठेही लोखंडी गळ नव्हता. मात्र दोरीला गाठ बसल्याने ती गुदद्वारामध्येच अडकून बसली होती. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक ही दोरी बाहेर काढण्यात आली, असे ते म्हणाले.