देशात सध्या नवउद्योगांसाठी पोषक वातावरणाची निर्मिती झाली आहे. पण यापूर्वीच्या वातावरणात आपली कल्पनाशक्ती वापरून अनेक उद्योग सुरू केलेत. यापैकी काही यशस्वी उद्योगांपैकी एक म्हणजे ‘प्राइसबाबा डॉट कॉम’ हे संकेत स्थळ.
आपल्याला एखादी मोठी वस्तू खरेदी करायची असेल तर आपण आपल्या आसपासच्या मंडळींची चर्चा करतो. सध्याच्या इंटरनेटच्या जमानात गुगल करून माहिती मिळवतो. ही सर्व माहिती मिळवत असताना उत्पादनात काय आहे हे जाणून घेत असतानाच सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे किमतीचा. आपल्याला पाहिजे ती वस्तू आपल्या घराजवळ कुठे व किती स्वस्त मिळेल याचा शोध आपण घेत असतो. ग्राहकाची नेमकी हीच गरज ओळखून अंकुर अग्रवाल आणि तीथ्रेश गणात्रा या दोन तरुणांनी काम सुरू केले आणि pricebaba.com या संकेतस्थळाची निर्मिती झाली.
मुंबईतील अंकुर हा विविध विषयांवर ब्लॉग लेखन करत असे. त्याचा ब्लॉग वाचून किंवा त्याचे अन्य मित्र आणि नातेवाईक कोणतीही गोष्ट खरेदी करताना त्याला माहिती विचारत होते. साधारणत: २०११ची ही गोष्ट. त्यावेळेस देशात ई-व्यापार संकेत स्थळांचा वापर तुलनेत कमी होत होता. त्यावेळेस लोकांना त्यांच्या विभागात कोणत्या दुकानात मोबाइल अधिक स्वस्त मिळतो ही माहिती मिळणे तसे अवघड होते. यामुळे लोकांची ही गरज ओळखून अंकुर आणि तीथ्रेश यांनी मुंबईच्या विविध विभागांतील दुकानांमध्ये कोणत्या प्रकारचे मोबाइल उपलब्ध आहेत. त्याची किंमत काय आहे याचा तपशील मिळवला आणि तो ऑनलाइन उपलब्ध करून दिला. यामुळे ऑफलाइन बाजारातील तुलना प्रथमच ऑनलाइन दिसू लागली. साधारणत: दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी देशातील मुंबई, बंगळुरू आणि दिल्ली यासह तेरा शहरांमध्ये तब्बल दोन हजारहून अधिक दुकानांचा तपशील मिळवला आणि तो ऑनलाइन उपलब्ध करून दिला. ग्राहकांना येणाऱ्या कोणत्याही शंकांचे निवारण करण्यासाठी त्यांची चार ते पाच जणांचा विशेष चमू तयार केला आणि ग्राहकांच्या तक्रारींची काळजी घेण्याचे काम त्यांच्याकडे सोपवले. यामुळे एकदा या संकेत स्थळाला भेट दिलेला ग्राहक पुन:पुन्हा तेथे जाऊन माहिती मिळवू लागला.
सुरुवातील अंकुरने स्वत:च्या पैशातून कंपनी सुरू केली. यानंतर त्याच्या नातेवाईकांकडून पैसे घेऊन त्याने आपला उद्योग वाढवण्यास सुरुवात केली. त्याच वेळेस नवीन उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तेथे त्यांनी त्यांची ही संकल्पना सादर केली. त्यावेळेस उपस्थित उद्योग जगतातील मान्यवरांना ही संकल्पना आवडली. तेथे पंकज जैन त्यांना भेटले आणि त्यांनी त्यांना अमेरिकेत येऊन ही संकल्पना समजाविण्यास सांगितले. तेव्हा हे दोघेही चार महिन्यांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले. तेथे त्यांना काही गुंतवणूकदार मिळाले व त्यांच्या अधारे त्यांनी आपला व्यवसाय वाढवत नेला. सध्या मोबाइलपुरते मर्यादित असलेल्या या संकेतस्थळावर लवकरच टीव्ही, फ्रिज अशा उत्पादनांच्या किमतीची आणि त्याची माहिती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र हे करण्यासाठी काही कालावधी द्यावा लागणार आहे.
सध्या देशात नवउद्योगांसाठी पोषक वातावरण असले तरी थेट परकीय गुंतवणूक धोरणात अजून काही अस्पष्टता आणि उद्योगास पुरक तरतुदी नसल्याची खंत तीथ्रेशने व्यक्त केली.

असा येतो पैसा
या उद्योगातून पैसे कमाविण्यासाठी अंकुर आणि तीथ्रेशने संकेतस्थळावर भेट देणाऱ्यांवर भर न देता छोटय़ा दुकानदारांची मदत घेतली. ई-व्यापार संकेतस्थळांवर दिल्या जाणाऱ्या सवलतींचा विचार करून ग्राहक तेथे जास्त वळू लागले. यामुळे छोटय़ा दुकानदारांना याचा फटका बसू लागला. अशा परिस्थितीत स्पध्रेत टिकण्यासाठी छोटय़ा दुकानदारांना त्यांनी ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून दिला. यामध्ये कंपनीचा प्रतिनिधी दुकानांमध्ये जाऊन तेथील उत्पादनांची माहिती मिळवतो. त्याचे छायाचित्रही घेतो आणि त्याचा तपशील संकेतस्थळावर अपलोड केला जातो. या संकेतस्थळाचा संदर्भ घेऊन त्या दुकानात ग्राहक गेल्यावर दुकानदाराला कंपनीला काही रक्कम द्यावी लागते. यातून कंपनीचे मुख्य उत्पन्न होते. याचबरोबर संकेत स्थळावर झळकणाऱ्या जाहिरातींमधूनही उत्पन्न होते.

आव्हानांचा सामना
गेल्या दोन वर्षांत ई-व्यापार संकेतस्थळांवरची विक्री वाढू लागली आहे. अशा वेळी तेथे जाणाऱ्या ग्राहकालाही आपल्या संकेत स्थळाकडे आणण्यासाठी ‘pricebaba.com ने एकाच उत्पादनाची फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनसारख्या संकेतस्थळावरील किमतीचा फरक उपलब्ध करून दिला.यामुळे हे संकेत स्थळ एकाच वस्तूची ऑफलाइन अर्थात दुकानातील किंमत आणि ऑनलाइन बाजारातील किमतीची तुलनात्मक माहिती देणारे ठरले आहे.
नव उद्यमींना सल्ला
सध्या महाविद्यालयीन तरुणांपासून अनेक पदवीधर तरुण एखादी संकल्पना समोर आणतात आणि गुंतवणूकदार मिळवून ती संकल्पना प्रत्यक्षात आणतात. पण हे करत असताना आपली संकल्पना किती व्यवहार्य आहे. ती बाजारात कोणत्या स्तरापर्यंत टिकाव धुरू शकेल. याचा विचार करणे आवश्यक आहे. याचबरोबर तरुणांनी हा उद्योग सुरू होतो आहे म्हणून हातातील इतर संधी सोडू नय, असा सल्ल तीर्थेशने नवउद्यमींना दिला आहे.