प्रत्यारोपणासाठी अनेकांची रुग्णालयात विचारपूस

मुंबई: रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरे (२४) हिला प्रत्यारोपणातून नवे हात मिळाल्यानंतर शहरात आणि शहराबाहेरही अनेकांनी प्रत्यारोपणासाठी ग्लोबल रुग्णालयात चौकशी सुरू केली आहे. दरम्यान मोनिकाला गेल्या आठवडय़ात शनिवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. नव्या हातांनी तिच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे.

मोनिका १७ वर्षांची असताना रेल्वे अपघातात तिचे दोन्ही हात गेले. या आघातानंतरही जिद्द न सोडलेल्या मोनिकाच्या वडिलांनी तिला पुन्हा नवे हात मिळवून देण्यासाठी धडपड केली. या प्रयत्नांना यश आले असून २० ऑगस्ट रोजी मोनिकाच्या दोन्ही हातांवर केलेली प्रत्यारोपणाची शष्टद्धr(२२९क्रिया यशस्वी झाली आहे. जवळपास १५  दिवसांच्या उपचारानंतर मोनिकाला शनिवारी घरी सोडले. या दरम्यान तिला करोना संसर्गाची बाधा होऊ नये म्हणून रुग्णालयात एका स्वतंत्र खोलीत ठेवले होते.

माझ्याजवळ कुटुंबातले कोणी नसले तरी एकटे वाटू नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली गेली. यानंतरचा प्रवासही खडतर आहे. हातांची खूप काळजी घ्यावी लागणार आहे याची मला कल्पना आहे. तरीही नवे हात मिळाले हा आनंदच खूप मोठा आहे. माझ्या वडिलांचे स्वप्न अखेर पूर्ण होणार, हे सांगताना मोनिकाच्या अश्रूंचा बांध फुटला.

मोनिकाच्या हातावरील प्रत्यारोपण देशभरातील ११ वे असून मुंबईतील पहिलेच आहे. येत्या काही आठवडय़ांत तिला कोपर हलवायला सांगितले जाईल.

याशिवाय हात आणि बोटांची तीन ते चार महिन्यांत हालचाल सुरू होणे अपेक्षित आहे. हालचाल, व्यायाम आणि फिजिओथेरपीद्वारे जवळपास दीड वर्षांनंतर ती स्वावलंबी होईल. यानंतरही मोनिकाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये यासाठी बराच काळ औषधेही घ्यावी लागणार आहेत.

या शस्त्रक्रियेनंतर हात, पाय इत्यादी अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी गेल्या चार आठवडय़ांत २० ते २५ जणांनी विचारणा केली आहे.

या शस्त्रक्रिया खर्चीक असून यात धोकेही आहेत. त्यामुळे ज्या शस्त्रक्रियांमुळे खरच दैनंदिन जगण्यात मोलाचा फायदा होणार असेल त्यांना प्राधान्य देणे योग्य असल्याचे प्लॅस्टिक अ‍ॅण्ड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सातभाई यांनी सांगितले.

अवयवदान करणे गरजेचे

चेन्नईच्या तरुणाचे अवयवदान केल्याने मोनिकाला नवे हात मिळाले आहेत. हात दान करण्यासाठी फारसे कोणी तयार नसते. त्यामुळे अशा अवयवांच्या प्रत्योरापणासाठी बराच काळ वाट पाहावी लागते. मोनिकाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून का होईना, अनेकजण अवयवदानासाठी नक्की पुढाकार घेतील, असा विश्वास रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तलौलीकर यांनी व्यक्त केले.

शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी फेसबुक मोहीम

मोनिकाच्या शस्त्रक्रियेसाठी आत्तापर्यंत सुमारे ३६ लाख रुपये खर्च आला आहे. यापुढेही तिला काही महिने उपचार लागणार असल्याने दर महिन्याला जवळपास १५ ते २० हजार रुपयांचा खर्च आहे.त्यासाठी सामाजिक संस्थांना साद घातली आहेच. ग्लोबल रुग्णालयाच्या फेसबुकवरही मोहीम सुरू केली आहे.  मोहिमेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन रुग्णालयाने केले आहे.