23 October 2020

News Flash

करोनामुक्त रुग्णावर यकृत प्रत्यारोपण

२२ वर्षीय तरुणाला जीवनदान

२२ वर्षीय तरुणाला जीवनदान

मुंबई : गेल्या १७ वर्षांपासून यकृताच्या आजाराशी झुंज देत असलेल्या २२ वर्षीय तरुणाने करोनावर मात केली असून, नुकतीच त्याच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. करोनामुक्त रुग्णावर प्रत्यारोपणाची भारतातील ही पहिलीच शस्त्रक्रिया असून लवकरच वैद्यकीय नियतकालिकातही प्रसिद्ध होणार आहे.

मुंबईचा रहिवासी रोशन गुरव पाच वर्षांचा असल्यापासूनच यकृताच्या आजाराने त्रस्त होता. गेल्या काही दिवसांत त्याच्या आजाराची तीव्रता वाढली होती. त्यामुळे यकृत प्रत्यारोपण हा एकमेव उपाय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

त्याच्या आईचे यकृत जुळल्याने प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय नानावटी रुग्णालयातील डॉक्टरांनी घेतला. परंतु प्रत्यारोपणापूर्वीच्या तपासणीदरम्यान रोशनला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे ही शस्त्रक्रिया सहा आठवडे लांबणीवर पडली. ‘रोशनने धैर्याने संसर्गाशी सामना केला. दोन तीव्र स्वरूपाचे आजार एकत्र असतानाही तो आठवडय़ाभरात बरा झाला’, अशी माहिती रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण सल्लागार डॉ. वैभव कुमार यांनी दिली.

शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून दोन आठवडय़ांत त्याला घरी सोडण्यात आले.

संसर्गजन्य आजाराच्या काळातही रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या रुग्णांमध्ये संसर्ग नियंत्रणाच्या उपचारपद्धती चांगल्या प्रकारे राबविता येतात, हे यातून सिद्ध झाले आहे. करोनाची बाधा नसलेल्या परंतु गंभीर प्रकृतीच्या सहा रुग्णांवर करोना साथीच्या काळात यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. वेळेत शस्त्रक्रिया झाल्याने या रुग्णांना जीवनदान मिळाल्याचे रुग्णालयातील ‘एचपीबी सर्जरी व यकृत प्रत्यारोपण’ या विभागाचे प्रमुख डॉ. अंकुर गर्ग यांनी सांगितले.

आईची भावना.. : यकृताच्या आजारामुळे रोशनला कावीळ, पोटदुखी, उलटय़ा आणि पोटात द्रव जमा होणे असे त्रास वारंवार व्हायचे. गेली १७ वर्षे तो या आजाराने त्रस्त होता. तो अभ्यासात हुशार असून, त्याला चित्रकलेतही रस आहे. परंतु आरोग्याच्या गुंतागुंतीमुळे त्याला अधिक महत्त्वाकांक्षा बाळगता आल्या नाहीत. नानावटी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांच्या पथकामुळे आता तो सामान्य जीवन जगू शकेल, अशी भावना रोशनची आई रश्मी गुरव यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2020 2:17 am

Web Title: successful liver transplantation on a corona recovered patient zws 70
Next Stories
1 Coronavirus : रुग्ण दुपटीचा कालावधी तीन महिन्यांवर
2 शासकीय कामांचे ‘दोष दायित्व’ धोक्यात
3 ‘मोनो’ला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद
Just Now!
X