24 September 2020

News Flash

२८ दिवसांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया!

केईएम रुग्णालयातील हृदयविकार विभागात आलेल्या २८ दिवसांच्या बाळाला एका दुर्मीळ आजाराने ग्रासले होते.

मुंबई महापालिकेचे केईएम रुग्णालय

केईएममधील डॉक्टरांकडून अवघड आव्हानावर मात

मुंबई : महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील हृदयविकार विभागात आलेल्या २८ दिवसांच्या बाळाला एका दुर्मीळ आजाराने ग्रासले होते. केईएमच्या हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल केरकर व सहयोगी प्राध्यापक डॉ. गिरीश सबनीस यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांनी या बाळावर (अ‍ॅवार्टा पल्मनरी विण्डो) बिनटाक्याची यशस्वी शस्त्रक्रिया केली. सर्वात कमी वयाची व कमी वजनाच्या बाळावरील अशा प्रकारची ही जगातील पहिली शस्त्रक्रिया असून ‘अ‍ॅनल्स ऑफ पेडियाट्रिक कार्डिओलॉजी’ जर्नलमध्ये नुकताच याचा निबंध प्रसिद्ध झाला आहे.

या बाळाच्या रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये गुंतागुंत होती. परिणामी हृदयातील अशुद्ध रक्त व शुद्ध रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये सरमिसळ होत होती. हा एक दुर्मीळ आजार असून एवढय़ा कमी वजनाच्या बाळावर ओपन हार्ट सर्जरी करणे हे एक जसे आव्हान होते तसेच बिनटाक्याची शस्त्रक्रिया करणे हेही तेवढेच मोठे आव्हान होते.

अनेक लहान बाळांमध्ये जन्मत: हृदयविकाराचे वेगवेगळे त्रास उद्भवतात. अशा लहान बाळांवर प्रामुख्याने ओपन हार्ट सर्जरी केली जाते. अलीकडच्या काळात मिनिमल इनव्हेसिव्ह तंत्र प्रगत झाल्यानंतर हृदयविकारतज्ज्ञ आता हृदयाच्या अनेक आजारांवर बिनटाक्याची शस्त्रक्रिया करू लागले आहेत.

आंध्र-तेलंगणाच्या सीमेवरील एका कुटुंबात या बाळाचा जन्म झाला असून जन्मत: त्याच्या हृदयातील दोन मोठय़ा रक्तवाहिन्यांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊन शुद्ध व अशुद्ध रक्ताचे मिश्रित होऊन हृदयावर त्याचा भार येऊन बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्याला आईचे दूध पिणेही शक्य होत नव्हते. अशा बाळांवर तात्काळ शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते अन्यथा एक वर्षांपेक्षा जास्त काळ ही बालके जगू शकत नाहीत. त्यामुळे नायरमध्ये दाखल करण्यात आलेल्या या बाळाला तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी ऑक्टोबर २०१६ मध्ये केईएम रुग्णालयात पाठवले. केईएममध्ये हे बाळ आले तेव्हा ते अवघ्या २८ दिवसांचे व पावणेतीन किलो वजनाचे होते. एवढय़ा कमी वजनाच्या बाळावर बिनटाक्याची शस्त्रक्रिया हे एक आव्हान होते. डॉ. प्रफुल्ल केरकर यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी भूलतज्ज्ञ तसेच हृदयशल्यचिकित्सांशी सखोल चर्चा करण्यात आली. एवढय़ाशा बाळाला भूल देणे हेही एक आव्हानच होते, असे डॉ. गिरीश सबनीस यांनी सांगितले.

डॉ. केरकर, डॉ. सबनीस, डॉ. हेतल शहा, डॉ. चरण लांजेवार हे हृदयविकारतज्ज्ञ तसेच डॉ. संचिता उंबरकर, डॉ. मंजू सरकार आणि डॉ. पुष्कर या भूलतज्ज्ञांसह हृदयशल्यचिकित्सकांच्या उपस्थितीत ही बिनटाक्याची शस्त्रक्रिया पार पडली. बाळाच्या मांडीला एक लहान छिद्र पाडून त्यातून कॅथेटरमधून एक वायर हृदयाजवळील रक्तवाहिन्यांची गुंतागुंत झाली त्या ठिकाणी नेण्यात येऊन डिव्हाइस सोडून सरमिसळ बंद करण्यात आली.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रक्तवाहिन्यांची सरमिसळ रक्तवाहिन्यांच्या उगमस्थानी नसल्यामुळे धोका कमी होता. आज दोन वर्षांनंतर बाळाची प्रकृती उत्तम असून गेल्याच महिन्यात ‘अ‍ॅनल्स ऑफ पेडियाट्रिक कार्डिओलॉजी जर्नल’मध्ये या शस्त्रक्रियेचा निबंध प्रसिद्ध झाल्याचे डॉ. सबनीस यांनी सांगितले.

केईएममध्ये देशभरातून हृदयविकाराचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात येत असून प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील रुग्ण दिल्लीला जाण्याऐवजी केईएममध्ये येणे पसंत करतात, असे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. केईएममध्ये होणारे यशस्वी उपचार लक्षात घेऊन वर्षांकाठी हृदयविकाराचा त्रास असलेली पाचशेहून अधिक लहान मुले उपचारासाठी येत असतात, असेही येथील डॉक्टरांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 3:51 am

Web Title: successful surgery on 28 day old baby from kem hospital doctors
Next Stories
1 ‘बिगरप्लास्टिक’च्या नावाखाली पुन्हा तेच!
2 धर्मनिरपेक्ष आघाडीसाठी काँग्रेसचाच पुढाकार हवा
3 रेल्वेचे जल-वे
Just Now!
X