12 November 2019

News Flash

बोअरवेलसाठी उपग्रहाद्वारे अचूक स्थान शोधण्याचे तंत्र यशस्वी

भाजपा प्रदेश सचिव संजय पांडे यांची माहिती

संग्रहीत

बोअरवेल खणण्यासाठी उपग्रहाद्वारे अचूक स्थान शोधण्याचे तंत्र यशस्वी झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोत्साहनामुळे हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे दुष्काळावर मात करण्यासाठी एक चांगला उपाय सापडला आहे, असे भाजपा प्रदेश सचिव व नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे यांनी मुंबईत सांगितले.

संजय पांडे म्हणाले की, बोअरवेल खणण्यासाठी अचूक स्थान सापडणे हे मोठे आव्हान असते. पारंपरिक पद्धतीने खणण्यात येणाऱ्या बोअरवेलला पाणी लागतेच असे नाही किंवा पाणी लागले तरी ते पुरेसे असेलच असेही नाही. अशा प्रकारे अंदाजे बोअरवेल खणल्यानंतर पाणी लागले नाही तर मोठे नुकसान होते. या पार्श्वभूमीवर उपग्रहाद्वारे बोअरवेलसाठी अचूक स्थान शोधण्याचे तंत्र महत्त्वाचे आहे. या तंत्रज्ञानाचे महाराष्ट्रासाठीचे अधिकार नानाजी देशमुख प्रतिष्ठानकडे आहेत. प्रतिष्ठान या तंत्रज्ञानाचा वापर करून बोअरवेल खणून काम पूर्ण झाल्यावर ते ग्रामसमितीकडे अथवा जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविणार आहे.

बोअरवेलसाठीचे स्थान अचूक शोधण्यासाठीच्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर सर्वप्रथम गेल्या वर्षी लातूर जिल्ह्यात केला गेला. लातूर शहराजवळ खणण्यात आलेल्या बोअरवेलला चांगल्या प्रमाणात पाणी मिळत आहे. वर्षभर या बोअरवेलमधून मिळणाऱ्या पाण्याचे निरीक्षण करण्यात आले व त्या आधारे हा प्रयोग यशस्वी झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्या आधारे वर्धा जिल्ह्यात आर्वी तालुक्यात खुबगाव या गावामध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून नुकतीच बोअरवेल खणण्यात आली व चांगले पाणी लागले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात तीन तर बीड जिल्ह्यात तीन बोअरवेल खणण्यात येणार आहेत. या सर्व ठिकाणच्या अनुभवाची माहिती एकत्र करून व्यापक प्रमाणात राज्यात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येईल.

 

 

First Published on June 25, 2019 3:35 pm

Web Title: successful techniques for finding accurate location by using satellite for borewell msr87