24 January 2021

News Flash

४२६ नवे रुग्ण; २८ जणांचा मृत्यू

पालिका रुग्णालयात करोनावरील नवीन औषधांचा यशस्वी वापर

संग्रहित छायाचित्र

गेल्या काही दिवसांपासून सतत सातशे ते आठशेच्या दरम्यान रुग्ण आढळत असताना मंगळवारी मात्र करोनाचे ४२६ नवे रुग्ण आढळले. २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पालिकेच्या रुग्णालयात करोना रुग्णांवर एका नवीन औषधांचा उपचार करण्यास सुरुवात केली असून या औषधांचे चांगले परिणाम दिसून आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

मुंबईत मंगळवारी ४२६ रुग्ण आढळले असून आतापर्यंत रुग्णांची संख्या १४,७८१ वर गेली आहे. तर २८ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा ५५६ वर गेला आहे. तर मंगळवारी २०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३३१३ झाली आहे.

तीव्र करोना रुग्णांसाठी नवीन औषध

करोनाची तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नवीन औषधाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. ‘इंजेक्शन टोसीलुझुमॅब’ हे नवीन औषध ४० गंभीर रुग्णांवर वापरण्यात आले आहे. त्यापैकी ३० रुग्णांमध्ये चांगले परिणाम दिसून आले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तसेच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज भासलेली नाही. त्यापैकी १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या औषधामुळे धारावीतील ३ पैकी १ गंभीर रुग्ण नायर रुग्णालयातून घरी गेला आहे. जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञ आणि रुग्णालये यांच्या अनुभवाच्या आधारे या औषधाचा वापर करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

सेव्हन हिल्स रुग्णालयातून १००६ रुग्ण करोनामुक्त

करोना उपचारात अत्यंत मोलाची भूमिका बजावणाऱ्या सेव्हन हिल्स रुग्णालयातून आज १००० वा रुग्ण करोनावर मात करून घरी गेला. १ एप्रिल रोजी पहिला करोनाबाधित रुग्ण या रुग्णालयात दाखल झाला होता. आजपर्यंत १००६ रुग्ण या रुग्णालयातून ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. घरी जाताना या रुग्णांना टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला. घरी जाताना या रुग्णांनी रुग्णालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

करोना रुग्णांवर उपचार करणारे हे मुंबईतील सर्वात मोठे रुग्णालय असून या रुग्णालयात तब्बल ८९८ खाटा आहेत. महिनाअखेरीस येथील खाटांची क्षमता १३०० पर्यंत नेण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.

धारावीतील रुग्णसंख्या हजाराच्या उंबरठय़ावर

दाटीवाटीने उभ्या असलेल्या धारावीमधील करोनाबाधितांची रुग्णसंख्या हजाराच्या उंबरठय़ावर पोहोचली आहे. मंगळवारी दिवसभरात धारावीतील ४६ जणांना करोनाची बाधा झाली असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे धारावीतील करोनाबाधित आणि मृतांची संख्या अनुक्रमे ९६२ व ३१ वर पोहोचली आहे.

धारावीमध्ये दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. मंगळवारी ४६ जणांना करोनाची बाधा झाली असून धारावीतील रुग्ण संख्या ९६२ झाली आहे. तर एका व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे करोनामुळे ३१ धारावीकरांना प्राण गमवावे लागले आहेत.

मंगळवारी माहीममधील सहाजणांना करोनाची बाधा झाली असून, या परिसरातील रग्णसंख्या १४३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत या परिसरातील सात नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दादरमध्ये मंगळवारी ११ जणांना करोनाची बाधा झाली असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यामुळे दादरमधील बाधित रुग्णांची संख्या १२५ वर, तर मृत्यू झालेल्यांची संख्या सात वर पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 12:50 am

Web Title: successful use of new drugs on corona in municipal hospitals abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 रुग्णालयांतील गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस
2 श्रमिकांच्या मोफत प्रवासाची फक्त घोषणाच
3 घरपोच मद्यविक्रीला अखेर मान्यता
Just Now!
X