ज्वेलरी ब्रँडची साखळी असलेल्या गुडविन ज्वेलर्सच्या मुंबईतील अनेक शाखा गुंतवणूकदारांना आणि ग्राहकांना कोणतीही माहिती न देता अचानक बंद करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या शाखांमध्ये ग्राहकांच्या ठेवी अडकल्या आहेत. याप्रकरणी फरार असलेल्या गुडविन ज्वेलर्सचे संचालक ए. एम. सुनिलकुमार, व्यवस्थापकीय संचालक ए. एम. सुधीशकुमार आणि व्यवस्थापक मनिष कुंडी यांच्याविरोधात ग्राहकांची फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी डोंबिवली पोलिसांत शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

गुडविन ज्वेलर्सच्या ठाणे, नवी मुंबई, मुंबई आणि केरळमध्ये येथे एकूण १२ शाखा आहेत. यांपैकी अनेक शाखा बंद करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात गुंतवणुकदारांनी डोंबिवली पूर्वमधील गुडविन ज्वेलर्सच्या मानपाडा रोड येथील शाखेकडे मंगळवारी विचारणा केली. त्यानंतर काही गुंतवणुकदारांनी शुक्रवारी संध्याकाळी ठाण्याच्या शाखेबाहेर आंदोलन केले. त्यानंतर शनिवारी मोठ्या प्रामाणावर सुमारे ३०० गुंतवणुकदारांनी गुडविन ज्वेलर्सच्या डोंबिवली शाखेबाहेर आंदोलन केले, यांपैकी १५० जणांनी डोंबिवली पोलिसांकडे धाव घेत गुडविनच्या मालकांविरोधात रितसर तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक एस. पी. आहेर यांनी सांगितले की, ग्राहकांनी तक्रार दाखल केल्यानंतर गुडविन ज्वेलर्सचे मालक आणि व्यवस्थापकांविरोधात आम्ही गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर डोंबिवलीतील शोरुमही आम्ही सील केले आहे. या प्रकरणात सुमारे २ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली असून अजूनही अनेक ग्राहक आमच्याकडे तक्रार दाखल करायला येत असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

गुडविन ज्वेलर्सच्या जगभरात १४ शाखा आहेत. यांपैकी १२ भारतात तर २ दुबईत आहेत. भारतातील सर्व १२ शाखा या डोंबिवली, अंबरनाथ, चेंबूर, वाशी, ठाणे, थ्रिसर (तामिळनाडू) आणि उर्वरित ३ शाखा या पुण्यात आहेत. या सर्व शाखा २२ ऑक्टोबरपासून बंद आहेत.