मुंबई : गृहनिर्माण विभागाच्या शिपाई पदासाठी उमेदवारांना पूर्वकल्पना न देता अचानक इंग्रजी विषयाची परीक्षा घेण्यात आल्यामुळे गोंधळ झाला. इंग्रजीची प्रश्नपत्रिका सोडवण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी त्यामध्ये वेळ वाया गेल्याची तक्रार उमेदवारांनी केली.

गृहनिर्माण विभागाच्या विविध पदांच्या भरतीची जाहिरात ऑगस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. महापरीक्षेमार्फत या भरती परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये पुणे विभागातील शिपाई या पदाचाही समावेश होता. त्यासाठी २५ गुण मराठी, २५ गुण सामान्यज्ञान आणि २५ गुण बुद्धिमत्ता चाचणी अशी ७५ गुणांची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले होते. त्यासाठी एका तासाचा कालावधी देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात परीक्षेच्या वेळी या तीन विषयांबरोबर २५ गुणाची इंग्रजीची प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यासाठी कालावधी मात्र एक तासच ठेवण्यात आला होता. त्यामुळे उमेदवारांचा गोंधळ झाला. परीक्षेची वेळ संपताना इंग्रजीची प्रश्नपत्रिका सोडवू नका, अशी सूचना देण्यात आली. मात्र या गोंधळात वेळ वाया गेल्याची तक्रार उमेदवारांनी केली आहे.