अर्थनीतीमध्ये आवश्यक बदल करणार

महाराष्ट्राची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने उत्पन्नवाढीसाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आता उद्योगपती आणि अर्थतज्ज्ञांशी चर्चा करुन यशाचा कानमंत्र जाणून घेणार आहेत. उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या उद्योगांच्या यशस्वी होण्याचे रहस्य जाणून घेऊन राज्याच्या अर्थनीतीमध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री करणार आहेत.

राज्यावर सध्या सुमारे साडेचार लाख कोटी रुपये कर्जाचा डोंगर असून तो वाढतच आहे. कर्जावरचे व्याज व मुद्दल फेडण्यासाठीही दरवर्षी नवीन कर्ज घ्यावे लागत आहे. शेतकरी कर्जमाफीमुळे सुमारे ३४ हजार कोटी रुपयांपर्यंत आर्थिक बोजा पडण्याची भीती आहे. तर जीएसटी व अन्य कारणांमुळे उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. पेट्रोल-डिझेलवर मूल्यवर्धित कर कमी केल्याने उत्पन्नात सुमारे तीन हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. तर सातव्या वेतन आयोगामुळे पुढील वर्षांत सुमारे २२ हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक बोजा पडणार आहे. या पाश्र्वभूमीवर राज्याच्या उत्पन्नात कशी वाढ करता येईल, कोणते नवीन मार्ग चोखाळता येतील, कशापध्दतीने करांचे सुसूत्रीकरण केल्यास, उत्पन्नाचे स्त्रोत वाढविल्यास किंवा नियम बदल केल्यास उत्पन्न वाढू शकेल आणि विकासालाही चालना मिळेल, या बाबींवर अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी लक्ष केंद्रित केले आहे आणि अर्थ खात्यासह विविध खात्यांशी ते गेले काही दिवस चर्चा करीत आहेत.

देशातील अनेक उद्योगसमूह चांगली कामगिरी करीत आहेत व नावाजलेले आहेत. त्यांच्या यशस्वितेचा कानमंत्र घ्यावा आणि राज्याच्या अर्थनीतीमध्ये कोणत्या प्रकारे बदल करुन तिला चालना द्यावी, याविषयी मुनगंटीवर हे उद्योगसमूहांच्या उच्चपदस्थांशी व अर्थतज्ज्ञांशी पुढील काही दिवसात चर्चा करणार आहेत.