देवेंद्र फडणवीस यांच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीमुळे ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची सरशी झाली असून माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना नमते घ्यावे लागले आहे. गडकरी यांच्यासाठी झालेली पक्षाची घटनादुरूस्ती त्यांच्या उपयोगी पडली नाहीच, पण माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनाही त्याचा फायदा होवू शकला नाही. घटनादुरूस्ती होवूनही भाजपच्या कोणत्याही नेत्याला अजून त्याचा लाभ झाला नसून पद सोडण्याची वेळ आली आहे. मुंडे यांची प्रदेशाध्यक्ष निवडीत आणि सरकारविरोधी आंदोलनात सरशी झाली तरी ते पक्षात मात्र एकाकी पडले होते. आता सर्वाचा पाठिंबा मिळविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.  
मुंडे आणि गडकरी यांच्यातील संघर्ष जुना असून गडकरी यांनी मुनगंटीवार यांनाच पुन्हा प्रदेशाध्यक्ष करण्याचा आग्रह धरल्याने हा डाव हाणून पाडण्यासाठी मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची शिफारस केली. मुनगंटीवार यांना हिरवा कंदील दाखविल्यास पक्षात लक्ष घालणार नाही, निवडणुकीत प्रचार करणार नाही, अशा धमक्या देत मुंडे यांनी लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरूण जेटली आदींकडे फडणवीस यांच्यासाठी आग्रह धरला. निवडणुकीच्या तोंडावर जनमानसात प्रभाव असलेल्या मुंडेंसारख्या नेत्याला दुखावणे केंद्रीय नेतृत्वाला शक्य नव्हते आणि गडकरींसह प्रदेश पातळीवरील नेत्यांनीही तडजोडीची तयारी दर्शविली. अध्यक्ष राजनाथसिंह, गडकरी आणि अन्य ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक होवून अखेर फडणवीस यांच्या नावावर बुधवारी शिक्कामोर्तब झाले आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घोषणा झाली.
दुष्काळग्रस्तांबाबत केलेल्या मागण्यांसाठी सरकारविरोधात सुरू केलेल्या संघर्षांतही मुंडेंनी बाजी मारली. औरंगाबादला बेमुदत उपोषण सुरू केल्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेकदा चर्चा करून ज्येष्ठ मंत्री पतंगराव कदम यांना पाठविले आणि मुंडेंच्या मागण्या मान्यही केल्या. या आंदोलनाचा राजकीय लाभ भाजपला होत असताना प्रदेश पातळीवरील नेते मात्र मुंडे यांच्यासोबत त्यावेळी नव्हते. उपोषणाच्या वेळीही राजनाथसिंह यांनी दूरध्वनीवरून मुंडेंची चौकशी केली होती आणि उपोषण लांबल्यास आपणही त्यात सहभागी होण्याची घोषणा केली होती. मात्र अध्यक्षांच्या दौऱ्याच्या वेळी आणि उपोषण आंदोलनातही गडकरी यांच्यासह प्रदेश पातळीवरील नेत्यांनी मुंडेंसोबत जाण्याचे टाळले. शिवसेना नेते उध्दव ठाकरे व अन्य नेत्यांनीही मुंडेंशी चर्चा केली. पक्षातील पदाधिकारी व बरेच नेते मात्र त्यांच्यासोबत नव्हते. त्यामुळे जिंकूनही सर्वमान्यता मिळविण्यात मुंडे हरले, असे चित्र आहे.